आरोग्य डोळ्याचे आणि….
काल आज एक प्रणाली माझ्या पाहाण्यात आली. आपण बहुतेकजणं दिवसभर तहानभूक विसरून संगणकावरच्या महाजालात बुडून जातो. माझ्यासारखीला तर अश्या वेळी काहीही सुचत नाही. संध्याकाळी संगणक बंद करून उठल्यावर मग हमखास पाठ, पाय, मान, हात, मनगट यापैकी काहीना काही हमखास दुखत असतंच. संगणक वापरणा-यांनी घ्यायाच्या काळजीत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की सतत संगणकाकडे पाहात राहिल्याने डोळ्यांना तर थकवा येतोच, पण सतत बसून राहिल्याने, माऊस वापरल्याने, टंकन केल्याने इतरही त्रास मागे लागतात. आता इतकं कळूनही वळत नाही हेच खरं. पण काल जी एक प्रणाली मी वापरली तिच्या सहाय्याने हे शक्य होऊ शकेल. ही प्रणाली वापरून तुम्ही तुम्हाला किती वेळाने , किती मिनिटांचा ब्रेक घ्यायाचाय ते ठरवून ठेऊ शकता. तेवढा वेळ झाला की आपोआप तुम्ही ठरवून दिलेला वेळ एक स्क्रिनसेव्हर तुमच्या संगणकावर प्रकट होतो. वेळ पूर्ण झाल्याशिवाय तो बाजूला करता येत नाही. आता ब्रेकची वेळ झाली आहे हे लक्षात येतं. मी दर तासाने दोन मिनिटाचा स्क्रिनसेव्हर लावून ठेवला आहे. दर तासाने सरळ उठून डोळ्यावर थंड पाण्याचे हबके मारून….एक भांडंभर पाणी पिऊन पुन्हा येईस्तोवर स्क्रिनसेव्हर गेलेला असतो. आरोग्याच्या दृष्टीने दिवसाला भरपूर पाणी पोटात जाणं आवश्यक असतं. शिवाय डोळ्यावर पाणी मारल्याने डोळ्याचं आरोग्यही सुधारतं. तुम्हीही ही प्रणाली वापरून आपल्या दिनक्रमात थोडासा चांगला बदल करा. लक्षात ठेवा चांगल्या सवयी या मुद्दाम लावून घेतल्याशिवाय लागत नाहीत.
