प्रकाशवाटा
बाबा आमटयांविषयी माहित नसलेला माणूस विरळाच. कुष्ठरोग्यांकरता आनंदवनाची उभारणा त्यांनी केली. त्याकरता बाबा आमटे स्वत:, साधनाताई आमटे, त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. विकास आणि डॉ.प्रकाश या सगळ्यांनीच आनंदवनाला वाहून घेतलं. मला स्वत:ला ही इतकीच माहिती होती. परंतु नुकतच डॉ. प्रकाश आमटयांचं ’प्रकाशवाटा’ हे पुस्तक वाचनात आलं आणि हे आमटे कुटुंबिय किती असाधारण आहे याचा प्रत्यय आला.
बाबांना आनंदवनात मदत करावी या हेतून डॉक्टरकी पास झालेल्या मुलांच्याकडून मात्र बाबांच्या काही वेगळ्याच अपेक्षा होत्या. आनंदवनापासून जवळपास २५० किमी अंतरावर भामरागड इथल्या हेमलकसा इथे कसलीही सुविधा नसलेल्या आदिवासी जनतेचे वास्तव्य होतं. त्यांच्या पुनर्वसनाचा निश्चय बाबांनी केला होता. एकंदर बांबाचे वय पाहाता , ही जबाबदारी मागचा पुढचा कसलाही विचार न करता डॉ.प्रकाश आमटे यांनी स्वत:वर घेतली. प्रकाशवाटा हे पुस्तक नुसतंच वाचून संग्रही ठेवण्यासारखे नाही. आपलं सुखासुखी जीवन सोडून अपरिचित परिसरातल्या अपरिचित लोकांकरता सगळं सर्वस्व देणं ही सोपी गोष्ट नाही. कसल्याही पायभूत सुविधा उपलब्ध नसतानाही आज हेमलकसा इथे ’लोक बिरादरी प्रकल्प’ उभा राहिला आहे.
नुसते बाबा , साधनाताई , डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांच्यापुरतंच हे जगणं मर्यादित नव्हतं तर त्यांच्या सुना, नातवंड आणि नातसुनाही तेवढयाच तन्मयतेने यात कार्यरत आहेत. ते पाहिलं की कोणत्या मुशीतून हे कुटुंब घडलंय याचा अचंबा वाटतो. डॉ. प्रकाश यांनी मंदाताईंबद्दल म्हटलेले एक वाक्य खूप काही सांगून जाते. ” सीतेला तरी कांचनमृगाचा मोह झाला, मंदाला कसलाच मोह झाला नाही.” हेमलकसा इथे वीजेची सोय नव्हती, आपला मुलगा-सून अशा गैरसोय़ीत राहातात म्हणून साधनाताई आनंदवनात पंखा वापरत नव्हत्या. इथल्या भागातल्या अगदी सरकारी कर्मचार्यांनाही नक्षलवाद्यांची भिती आहे. पण आमटे कुटुंब इथल्या लोकांना देवदूतासमान आहेत.
माझ्यासकट अनेकांना या ’लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल ’ माहिती नव्हती, नाहिये. त्यांच्याकरता मी इथे काही विडीयोज देत आहे. अनेक परदेशी संस्थांनी आजवर या प्रकल्पाकरता मदत केली आहे. पण अजूनही या प्रकल्पाकरता मदतीचा हात हवा आहे.
