दीपलक्ष्मी दिवाळी २००९

श्री दिपलक्ष्मी च्या दिवाळी २००९ अंकाच्या संपादकीय मध्ये माझ्या या ब्लॉगचा छापील उल्लेख वाचून आनंद झाला. पण त्यात दिलेली माहिती थोडी चुकीची होती. अर्थातच तसे ईपत्र मी संपादकांना पाठवले आहे. पाहूया काय उत्तर येते त्यांचे. :-)

श्री. हेमंत रायकर यांस,

आपला दिवाळी२००९ चा ’श्री दिपलक्ष्मी’ चा अंक नुकताच वाचनात आला. त्यात तुमच्या संपादकीय लेखात माझ्या http://www.majhimarathi.wordpress.com या मराठी ब्लॉगचा उल्लेख पाहून थोडे आश्चर्य वाटले. एक तर आपला काहीच पूर्वपरिचय नाही, किंवा छापण्यापूर्वीही आपला काही संपर्क झाला नव्हता. दुसरं म्हणजे ज्या संकेतस्थळांबरोबर आपण माझ्या ब्लॉगचा उल्लेख केलात ; ती सगळी फारच मातब्बर संकेतस्थळे आहेत. त्यांच्या पंक्तीत बसण्याची माझी योग्यता नाही. अर्थात्‌ त्यांच्याशेजारचे मिळालेले स्थान किंवा माझ्या ब्लॉगचा जाहीर उल्लेख सुखावून गेला हे खरेच. आपल्या करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेतली ह्याचा आनंद शब्दातीत आहे.

परंतु आपण ज्या कामाकरता माझ्या ब्लॉगची दखल घेतल्याचे छापले आहे, त्या बाबत एक चूक झाली आहे. अजून तरी मी कोणताही ई दिवाळी अंक प्रकाशित केलेला नाही( पण इतरांच्या ई-दिवाळी अंकाचे दुवे माझ्या ब्लॉगवर दिले आहेत). मात्र सध्या एका डिजीटल अंकाची पिडीएफीय आवृत्ती करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. याव्यतिरिक्त मराठीपुस्तके.ऑर्ग या संकेतस्थळाकरता कॉपीराईट कायद्याच्या कक्षेबाहेर असलेली पुस्तके डिजिटल रूपात आणण्याकरता कार्यरत आहे.

असो, मुळात मराठी वाचकांनी दोन लाखांच्या वर भेट देऊन गेलेल्या माझ्या ब्लॉगची शान मात्र एका छापील अंकाने घेतलेल्या दखलीमुळे आता वाढली आहे.

 

माझी दुनिया