नुकताच या जालनिशीने ३ लाख वाचक भेटींचा मैलाचा दगड पार केला. या कामगिरीबद्दल खरं तर वाचकांचे जास्ती आभार मानणं गरजेचं आहे. एका सामान्य मराठी जालनिशीला इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचकांनी भेट द्यावी, ती वाचावी हे सारं अचंबित करणारं आहे. बरं ! ही जालनिशी दिसायला तशी साधी सुधीच, वर्डप्रेसवर असल्याकारणाने फारशी रंगरंगोटी करून न सजवलेली, जमेल तेव्हा जमेल तश्या टेम्पलेट्स वापरून सारवलेली, तरिही इतक्या वाचकांनी त्याला भेट द्यावी असं काय बरं आहे यात ? एखाद्या मान्यवर लेखकाची किंवा प्रसिद्ध व्यक्तिची असती तरी भाग वेगळा, पण तसेही नाही. मी इथे जे काही खरडते ते काही अभिजात साहित्य असल्याचाही माझा दावा नाही.
मुळात मी इथे स्वत:ची प्रतिभा दिसण्यासारखं फार काही लिहितच नाही. रोजच्या वाचनातून मला आकलन झालेले, माझ्या डोक्यातले विचार, आवडलेले सुविचार असं काही बाही इथे टंकीत असते. नाही म्हणायला माझी प्रतिभा दाखवायचा निष्फळ प्रयत्न मी एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल चार ( १ , २ , ३ , ४ )वेळा देवकाकांनी काढलेल्या ईअंकांमध्ये केला होता. नुसतंच लिखाण नाही, तर होळी अंक पुस्तकासारखा प्रकाशित करण्याकरता आणि पावसाळी अंक एका वेगळ्या स्वरूपात प्रकाशित करण्याकरता त्यात तंत्रप्रमुखाची भूमिकाही निभावली होती.
पहिले दोन अंक ब्लॉगर वर प्रकाशित करत असताना; रंगसंगती आणि इतर अनेक सुविधा मिळाव्यात वर्डप्रेसचा नाद सोडून मी सुद्धा ब्लॉगर वर ब्लॉग काढावा का असा प्रश्न वाचकांपुढे मांडला होता. आलेल्या ४२ मतांपैकी ५७.१ % वाचकांनी आहे तोच ब्लॉग चालू ठेवावा असा कौल दिला. काही जणांनी वर्डप्रेस ’बेस्ट’ असल्याचं सांगून, ब्लॉगरच्या वाटेला न जाण्याचं सांगितलं. खरं तर हे मलाही माहित होतंच…पण आपल्याला हवा तसा ब्लॉग सजवू शकत नाही ही रुखरूख मनात होती. अश्या वेळी तिसर्या ई अंकाच्या वेळी काकांनी मलाच तंत्र प्रमुख म्हणून नेमले. आता आपल्या मनातला ब्लॉग या अंकाच्या रूपाने साकारेल अश्या भ्रामक समजुतीने कामाला लागले खरे पण दोनच दिवसात माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. ब्लॉगरने टेम्पलेट हवी तशी वळवून आपल्याला हवे ते स्वरूप देण्याचा उदारपणा दाखवला असला, तरी ते कोडींग बिडींग येतंय कोणाला ? शेवटी चुकत माकत, स्वत:च्या अज्ञानाला अनेक बोल लावत कशीबशी ती टेम्पलेट आणि अंक पूर्ण केला. इथेच माझा, माझा वर्डप्रेसवरचा ब्लॉग ब्लॉगरवर हलवायचा निश्चय डळमळला. म्हणून आज माझ्या ब्लॉगला हा सुदिन दिसला ![]()
लोकांना असेही वाटण्याचा संभव असेल की, ही बया दिवसभर इथेच असते. बसली असेल स्वत:च ब्लॉगवर टिचक्या देत…आकडा वाढायला काय जातंय ! पण ते ही शक्य नाही ना ! नाहितर केव्हाच हे करून पाहिलं असतं. काय आहे ना ! वर्डप्रेसची स्वत:ची एक वाचकसंख्या मोजायची पद्धत आहे. त्यात मालकाच्या भेटी गणल्याच जात नाहीत.
यापुढे वाचकांनी त्यांना इथे काय वाचायला आवडेल ते सांगितल्यास, त्या दिशेने नक्की पाऊल टाकता येईल.






अभिनंदन! त्रिवार अभिनंदन श्रेया. लवकरच दशलक्षाधीश बनशील. तथास्तु!
अभिनंदन….अभिनंदन…अभिनंदन…!!!
असे बरेच सुदिन तुमच्या ब्लॉगला दिसो हयासाठी लाख लाख शुभेच्छा…
अभिनंदन श्रेयाताई.
तुमच्या आवडीचं वाचायला आवडेल. आपली आवड आपण सर्वात व्यवस्थित मांडू शकतो.