Posts Mentioning RSS Toggle Comment Threads | Keyboard Shortcuts

  • माझी दुनिया 3:18 pm on December 11, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

    कोणे एके काळी जगभरातल्या साऱ्या रंगांचं भांडण सुरू झालं. भांडणाचा मुद्दा होता सर्वश्रेष्ठ कोण? आपणच श्रेष्ठ, आपणच सर्वोत्तम, आपणच सर्वांच्या आवडीचे, सर्वांच्या उपयोगाचे म्हणून आपल्यालाच सर्वांत जास्त महत्त्व हवं, असं प्रत्येकालाच वाटत होतं.

    हिरवा म्हणाला – मीच सर्वांत श्रेष्ठ, सर्वांत महत्त्वाचा आहे, हे अगदी स्पष्टच आहे. गवत, झाडं, पानं यांच्यासाठी माझीच निवड केली गेली ती काय उगीच? अनेकदा तर या साऱ्यांना “हिरवाई’ म्हटलं जातं ते माझ्यामुळेच. मी नसेन तर, प्राणी मरतीलच. जरा शहरांच्या बाहेर नजर तर टाका. सगळीकडे तुम्हाला माझंच साम्राज्य दिसून येईल…

    हिरव्याचं म्हणणं मध्येच तोडत निळ्यानं म्हटलं, “”तू तर फक्त धरतीचा विचार करतोयस. जरा आकाश आणि समुद्राचाकडे नजर तरी टाक! जीवनाचं मूळ तर उंचावरल्या ढगांतून आणि सागरातून असणारं पाणीच आहे. आकाशामुळे मिळते शांतता, प्रसन्नता! माझ्या या करामतीविना तुझं अस्तित्वही दिसणार नाही.”

    निळ्याचे हे बोल पूर्ण होतात न्‌ होतात तोच पिवळ्याची चुकचुक ऐकू आली. तो म्हणाला, “”तुम्ही सारे किती गंभीर आहात रे. माझ्याकडे पाहा, मी कसा आनंदी, स्वच्छंद, खेळकर आणि उबदार आहे. सूर्य पिवळा आहे. सूर्यफुलाकडे पाहिलं की सारं जग हसू लागतं. माझ्याशिवाय जगात काही मजाच नाही.”

    पिवळ्याचं बोलून होतंय न होतंय तोच नारिंगी रंगाने आपलं घोडं पुढे दामटलं, “”मी आरोग्याचा, त्यागाचा आणि शक्तीचा रंग आहे. मी फारसा कुठे दिसत नसेन, पण मानवजातीसाठी माझं अस्तित्व आवश्‍यक आहे. गाजरं, भोपळे, संत्री, आंबे आणि पपया आठवतायत तुम्हाला? सारी जीवनसत्त्वं माझ्यामुळेच तुम्हाला मिळतात. मी काही नेहमी सर्वत्र नसतो. पण, सूर्योदय-सूर्यास्ताला क्षितिजावर माझं अस्तित्त्व दिसू लागलं की, लोकांना तुमची कोणाची आठवणही राहात नाही!”

    शेंदरी रंगाची ती फुशारकी ऐकून लाल रंग अगदी लालेलाल होऊन गेला आणि जवळजवळ ओरडलाच, “”मी तुम्हा सर्वांचा राजा आहे. मी रक्त आहे! आयुष्य रक्तामुळेच आहे. मी शौर्य आणि धोक्‍याचा रंग आहे. मी ध्येयासाठी लढतो. माझ्यामुळे रक्त सळसळतं, उसळतं! माझ्याविना पृथ्वी चंद्रासारखीच पांढरीफटक पडेल. मी उत्कट प्रेमाचा रंग आहे. गुलाबाचा रंग आहे.”

    लाल रंगाचं हे भाषण सुरू असतानाच जांभळा रंग उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला, “”मी सत्तेचा आणि कुलीनतेचा रंग आहे. मोठमोठे राजे, सेनापती, आचार्य यांनी आपली सत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा प्रभाव दाखविण्यासाठी नेहमी माझीच निवड केली आहे. लोक मला प्रश्‍न विचारीत नाहीत. माझे ऐकतात. आज्ञा पाळतात.”

    अगदी शेवटी पारवा रंग बोलता झाला. इतरांच्या मानाने अगदी हळूवार आवाजात, परंतु त्याच निर्धाराने तो बोलत होता. म्हणाला, “”माझ्याकडे पाहा. मी आहे शांततेचा रंग. क्वचितच कोणी माझी दखल घेतो. पण, मी नसलो तर सारं उथळ भासतं. विचार, प्रतिभा, शांत- संथ जलाशय यांचं प्रतिनिधित्व मी करतो. संतुलन आणि आत्मसमाधानासाठी तुम्हाला माझीच गरज असते.”

    असं रंगांचं भांडण सुरूच राहिलं. स्वतःची सर्वोत्तमता सिद्ध करण्यासाठीचा त्यांचा आग्रह चालूच राहिला. त्यांचे आवाज हळूहळू चढत गेले.

    अचानक वीज कडाडली. प्रकाशाचा एकच लोळ उठला. घनमेघ गर्जू लागले. पावसाच्या धारा बरसू लागल्या. आपापला बचाव करण्यासाठी आता परस्परांचा आधार घेण्यावाचून रंगांकडे काही गत्यंतर उरलं नव्हतं.

    मग पावसाचाच आवाज ऐकू येऊ लागला. “”अरे मूर्ख रंगांनो! स्वतःचा बडेजाव मिरवीत असे आपसात भांडत काय बसलात? तुम्हाला हे ठाऊक नाही काय की, तुमचं प्रत्येकाचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य आहे? काही विशेष कार्यासाठी तुमचा प्रत्येकाचा आविष्कार झालेला आहे? धरा आता एकमेकांचे हात आणि चला माझ्याबरोबर.”

    रंगांनीही त्याचं निमूटपणे ऐकलं. पाऊस पुढे बोलू लागला. “”आता यापुढे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुम्ही सारे एकत्र येऊन आकाशात सुंदर कमान तयार कराल. त्याने आपापलं वैशिष्ट्य कायम ठेऊन एकत्र येता येतं, एकत्र राहता येतं आणि त्यातूनच स्वर्गीय सौंदर्य साकारतं, हे मला इतरांना दाखवता येईल. तुमची ती कमान म्हणजेच इंद्रधनुष्य हे उद्याची आशा जागवीत येईल.”

    तेव्हापासून चांगला पाऊस झाला की, आभाळात इंद्रधनुष्य दिसू लागतं. असं इंद्रधनुष्य दिसू लागलं की, परस्परांच्या सोबतीने गुण्यागोविंदाने राहण्याची आठवण आपल्याला होवो, हीच शुभेच्छा!

     
  • माझी दुनिया 5:11 pm on October 29, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

    एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली.
    तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’ ती मनात विचार करत होती.

    दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.

    “आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.

    थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.

    आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.

    निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात.

    जीवनात परत न येणाऱ्या पाच गोष्टी :
    दगड
    बोललेला शब्द
    निघून गेलेली संधी
    निघून गेलेली वेळ
    आणि प्रेम

    संकलन – प्रीती खोलम

     
    • jeevan 10:43 pm on ऑक्टोबर 29, 2007 Permalink | प्रत्युत्तर

      best

    • mehek 7:38 pm on डिसेंबर 10, 2007 Permalink | प्रत्युत्तर

      superb

    • Virendra Bhat 9:04 pm on जानेवारी 24, 2008 Permalink | प्रत्युत्तर

      Too Good..!!

    • aaditi 5:36 pm on फेब्रुवारी 25, 2008 Permalink | प्रत्युत्तर

      khup bodh devun geli hi katha. mala khup aawadali

    • dr.archana 1:30 pm on ऑगस्ट 29, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      mind blowing,too gud

    • Atul 5:41 pm on ऑक्टोबर 28, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      Nice
      बोधकथा

    • ramdas 12:11 सकाळी on नोव्हेंबर 19, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      mund blowing, super……………………..

    • sandeep Ghule 11:03 सकाळी on नोव्हेंबर 25, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      khupach chhan katha aahe. mala khup aavdali…

  • माझी दुनिया 5:54 pm on October 13, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

    एक मनुष्य होता. त्याचा छोटासा व्यवसाय होता. घर, संसार, व्यवसाय या सर्व आघाड्यांवर लढताना त्याची खूपच तारांबळ उडत असे. रोज रात्री झोपताना तो देवाजवळ प्रार्थना करायचा, “देवा मला अशा जागी घेऊन चल, की जेथे व्याप-ताप, काळज्या काहीही नसेल. मी जी इच्छा मनात आणेन, ती पूर्ण होईल.’
    … आणि खरोखरच एक दिवस देव त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, “तुझ्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करेन. फक्त मी सांगतो तसं कर. अमुक दिशेने प्रवास करायला सुरवात कर. काही दिवस प्रवास केल्यानंतर तुला एक मोठ्ठं शहर लागेल. त्या शहराच्या पुढे एक मोठं वाळवंट आहे. ते पार केल्यानंतर तू माझ्या शहरात येऊन पोहोचशील. तुझ्या सगळ्या काळज्या मी दूर करेन. फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेव, वाळवंटाच्या अलीकडच्या शहरातील लोक तुला माझ्या शहरात यायचे अनेक जवळचे मार्ग सांगतील. तू त्या मार्गाने आलास तर जेमतेम माझ्या शहराच्या वेशीपर्यंत पोहोचू शकशील. कालांतराने तुझी तिथून हकालपट्टी होईल. मग तुझी अवस्था सध्यापेक्षाही वाईट होईल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुझं तूच काय करायचं ते ठरव.’ इतकं बोलून देव अदृश्‍य झाला.

    दुसऱ्या दिवशी त्याने बायको-मुलांना स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. देवाच्या शहराचा शोध घेण्याचा मनोदयही जाहीर केला. घरच्यांनी त्याला विरोध केला. त्याने आपला सुखाचा जीव दु:खात घालावा, असं वाटत नव्हतं. उलट आहोत त्यात अजून काटकसर करण्याचं, हौस-मौज कमी करण्याचं आश्‍वासनही त्याला दिलं.

    हे सगळं ऐकल्यावर देवाच्या शहरात जाण्याचा त्याचा निश्‍चय थोडासा उणावला. तरीही आतून कुठेतरी वाटत होतंच, की देव माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्याने मला मार्ग व्यवस्थित सांगितलाय. धोक्‍याच्या जागाही दाखवल्यात. मग जाऊन बघायला काय हरकत आहे?

    हो-नाही करता करता त्याने देवाच्या शहरात जायचं निश्‍चित केलं. बाकी कोणालाही बरोबर न घेता तो निघाला. निघताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून वाटखर्चासाठी थोडे पैसे बरोबर घेतले.

    तो वाळवंटाच्या अलीकडच्या शहरात पोचला, तेव्हा त्याच्याजवळ फारच थोडे पैसे शिल्लक होते. देवानं सांगितल्याप्रमाणे तिथे त्याला जवळचा मार्ग सांगणारे, देवाच्या शहराच्या वेशीजवळ नेऊन सोडतो म्हणणारे, अनेक जण भेटले; पण त्या कोणाचंही न ऐकता त्यानं वाळवंटातून चालत जायचं ठरवलं. वाळवंटातून चालताना त्याला अनेक वादळांचा सामना करावा लागला. कित्येकदा त्याला भुलवण्यासाठी, त्याची दिशाभूल करण्यासाठी वाटेत अनेक जण आडवे येत; पण त्याचबरोबर त्याच्यासारखे ठराविक ध्येयाने प्रेरित होऊन शहराकडे वाटचाल करणारे समविचारी लोकही त्याला भेटले.

    अशाप्रकारे एकमेकांशी गप्पा मारत पुढे वाटचाल करता करता देवाच्या शहराची वेस आता दृष्टीच्या टप्प्यात आली. आता केवळ एक-दोन दिवसांचाच प्रवास उरला असेल. इतक्‍यात मोठं वादळ झालं आणि सगळ्या दिशा आंधळ्या करून या साऱ्यांना भलत्याच दिशेकडे ढकलत घेऊन जायला लागलं. मग या लोकांनी ठरवलं, की आपण एकमेकांचे हात घट्ट पकडून हे वादळ शमेपर्यंत आहे तिथेच उभं राहायचं.

    कालांतराने वादळ शमलं; पण समोर पाहिलं तर वेस अदृश्‍य झाली होती. सभोवार नजर टाकली, तर कोणत्याही दिशेला देवाच्या शहराचा मागमूस नव्हता. सुदैवानं त्यांच्यातील एकाला अशा प्रकारच्या वादळांचा थोडाफार अनुभव होता. वादळानंतर योग्य वाट कशी काढायची, याचीही थोडीफार माहिती होती. त्याने रात्रीच्या अंधारात ग्रह, तारे, चंद्र, ध्रुव वगैरेवरून एक दिशा ठरवली. सूर्याच्या उगवती-मावळतीवरून ती पक्की केली आणि सर्वांनी तीच दिशा धरून चालायला सुरवात केली.

    अखेर दोन-तीन दिवसांनी ते देवाच्या शहराच्या वेशीपाशी येऊन पोचले. आपण आल्याची खबर द्वारपालाला दिली. त्यांच्या अंगावरचे कपडे जरी मळके, फाटके असले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांची खबर देण्यासाठी द्वारपाल धावतच देवाकडे गेला. आत प्रवेश मिळण्यापूर्वी ही मंडळी तिथेच जराशी विसावली आणि चालत आलेल्या मार्गाकडे पाहू लागली. त्यांना जाणवलं, की त्यांची दृष्टीसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त तीक्ष्ण आणि स्पष्ट झाली आहे. ज्या मार्गाने आपण चालत आलो, त्या मार्गाने बरेच लोक चालून येताहेत. काहीजण वाटेतच खचून, नाउमेद होऊन कोसळून पडताहेत. फक्त थोडेसेच लोक या मार्गावर पुढे पुढे वाट काढत, सर्व अडथळ्यांचा सामना करत येताना दिसताहेत. जे कोणी जवळच्या मार्गाचा वापर करताहेत ते देवाच्या शहराच्या वेशीचा दरवाजा दिसेल इतक्‍या अंतरापर्यंत पोचताहेत आणि तिथे आल्यावर तयार होणाऱ्या वादळात भरकटत जाऊन भलतीकडेच फेकले जाताहेत.

    इतक्‍यात द्वारपालाने स्वत: देवच त्यांच्या स्वागताला आपल्याची बातमी त्यांना दिली. सर्वजण वेशीतून आत शिरले. प्रत्यक्ष देव त्यांच्या स्वागताला उभा होता. देवाच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला, कारण प्रत्येकाला देव हुबेहूब स्वत:सारखाच दिसत होता.

     
  • माझी दुनिया 7:36 am on October 9, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

    एकदा एक छोटी मुलगी आणि तिचे वडील एक पूल पार करत असतात. मुलगी पडेल, याची वडिलांना थोडी भीती वाटते आणि ते तिला म्हणतात, “बाळा, माझा हात धर’. मुलगी पटकन म्हणते, “नको बाबा, तुम्हीच माझा हात धरा’. वडील कौतुकाने विचारतात, “अगं बाळा, काय फरक पडतो?’ मुलगी म्हणते, “खूप फरक पडतो बाबा. मी तुमचा हात धरला आणि मला काही झाले, तर मी पटकन हात सोडून देईन. पण मला माहितीय, तुम्ही माझा हात धरला असताना काहीही झालं तरी तो सोडणार नाही.’

    तात्पर्य – कोणत्याही नात्यामधील विश्‍वास बंधनकारक नसतो, तर तो एक न तुटणारा बंध असतो.

     
  • माझी दुनिया 12:04 pm on July 15, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

    ( डॉ. राजेंद्र बर्वे )
    ************************************************
    स्पर्धेचं आणि शर्यतीचं वातावरण आजसर्वत्र दिसतंय. चढाओढीच्या धुंदीनं आज सारे नादावलेले आहेत. जिद्द, चिकाटी हेच गुण आज महत्त्वाचे आहेत. हेच सांगणारी ही जपानी लोकांची गोष्ट. ही गोष्ट थोडी क्रूर वाटेल आणि काही लोकांना रुचणारही नाही. अर्थात, काही लोकांना “त्यात काय क्रूर वाटायचंय? किंवा न रुचणारं आहे? असेही प्रश्‍न पडतील; तर असे प्रश्‍न घेऊनच प्रश्‍न सोडविणाऱ्या जपान्यांची ही गोष्ट…
    ************************************************
    एकदा काय झालं… एकदा नाही हो, बऱ्याचदा काय झालं, की जपान्यांना त्यांचे आवडते मासे मिळेनात. म्हणजे जपानी लोकांना कच्चे मासे खायला आवडतं, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. “सुशी’ या सोज्वळ नावानंही जपानी डिश लोकप्रिय आहे; तर किनाऱ्याजवळच्या समुद्रात मासेमारी केल्यानं “सुशी’साठी लागणारे मासे संपले. म्हणजे जपानी कोळी जाळीबिळी टाकायचे; पण त्यात सुशीयोग्य मासे सापडायचे नाहीत.

    आता काय करायचं?
    त्यांनी उपाय शोधला. मोठ्या बोटी घेऊन ते समुद्राच्या आतल्या भागात गेले. तिथे “सुशी’ सापडले. मग काय? पकडले आणि आणले! पण गंमत अशी झाली, की बोटी किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे त्यांना परत यायला वेळ लागे. तोपर्यंत “सुशी’ मासे मरून जात. मग त्या माशांच्या मासामध्ये ती गंमत येत नसे. आता काय करायचं?

    मग त्यांनी ठरवलं. दूर समुद्रात जाणाऱ्या बोटीत आपण “फ्रिझर्स’ ठेवू. त्यात माशांना बंद करू. किनाऱ्यावर पोचलो. त्यांना पुन्हा वॉर्मअप करू की सुशी तय्यार.

    झालं, तो प्रयोग यशस्वी झाला. मासे अगदी फ्रेश राहू लागले; पण फ्रिझरमध्ये ठेवलेले मासे आणि ओरिजनल सुशी यात फरक होता. तेव्हा फ्रिझरची आयडिया अगदी व्यावहारिक; पण मत्स्यप्रेमींनी नाकं मुरडली.

    आता काय करायचं?
    पण जपानी लोक डोकेबाज. त्यांनी काय केलं? त्या मोठमोठ्या बोटींवर मोठाले टॅंक बांधले. त्या पाण्यात मासे सोडायचे आणि जिवंत आणायचे. किनाऱ्याला लागले, की टॅंकमधून बाहेर. सुशी तय्यार! वा! सुशीच्या डिश जपानी रेस्टॉरंटमधून मिळू लागल्या.

    पण गुणवत्तेच्या बाबतीत चोखंदळ जपान्यांनी आपली इवलीशी नाकं मुरडली. जिवंत माशांची सुशी बरी लागली खरी; पण त्या टॅंकमध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या माशांत तसा दम नव्हता. त्यांच्या हालचाली मंदावलेल्या. त्यांची तोंडं मरगळलेली. ओरिजनल सुशी ती ओरिजनल सुशी, हो की नाही मिस्टर सुझुकी? हो! अगदी खरं मिस्टर यामा टोमो! किंवा मि. यामोटोमा!!

    आता काय करायचं?
    जपानी कोळी लई हिकमती मानूस. तो काय असा डगमगनारा न्हवेच!

    त्यानं डोकं खाजवलं, विचार केला आणि अखेर एक शक्कल सुचली. शक्कल म्हणजे भारी अक्कल असल्याशिवाय शक्‍यच नाही.

    त्यांनी बोटीवरील टॅंकचा अभ्यास केला. टॅंकमधले मासे मरगळतात का? मंदावतात का? त्यांच्या वावरण्यात जोम का राहत नाही? त्यांच्या हालचालींतील जोश का हरवतो?

    जपानी गडी रिसर्चमध्ये एकदम हुश्‍शार बरं. हार खाणारा नव्हे! सुशी खाल्ल्याचा परिणाम दुसरं काय?

    बरं, युक्ती नामी. त्यांनी? काय केलं त्या टॅंकमध्ये माशांमध्ये जिवंतपणा, जोश व जोम टिकविण्यासाठी काही शार्क मासे सोडले. झालं! या शार्क माशांच्या तडफदार आणि झटपट हालचालींमुळे इतर माशांना पळता भुई! सॉरी पोहता पाणी अपुरं पडू लागलं.

    साऱ्यांना एकच धास्ती, या शार्कपासून कसा बचाव करायचा?

    बोटी किनाऱ्याला लागेपर्यंत सगळे मासे ताजेतवाने, तरतरीत आणि तडफदार राहू लागले! जपानी लोकांना अगदी हव्वी तश्‍शी ताजी सुशी मिळू लागली!!

    जपानी लोक खूश झाले. मित्रहो, या गोष्टीत तुम्हाला एक ठाम बाजू घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही माशांच्या बाजूचे की माणसांच्या?

    माशांच्या बाजूचे असाल, तर त्यांच्या “सकाळ’मध्ये “माणसांच्या क्रूरपणाची कमाल’ अशा शीर्षकाखाली इथल्या प्रसंगाचं रिपोर्टिंग होईल. तुम्ही माणसांच्या बाजूचे, सुशीप्रेमी मत्स्याहारी असाल तर कधी एकदा सुशी खातोय, असं तुम्हाला वाटेल. तुमच्या लेखी माणसाच्या मर्मभेदी संशोधनाची आणि अक्कलहुशारीची गोष्ट ठरेल.

    पैकी कोणाचीही बाजू घ्यायची नसेल, तर उत्तम. कारण ही गोष्ट ना माशांची, ना माणसांची आहे; माणसामधल्या तडफदारीची. तुम्हाला जीवनातला जोश टिकवायचा आहे. तुम्हाला सळसळत्या उत्साहानं जगायचंय? तुम्हाला जोमानं जीवनाचं आव्हान स्वीकारायचंय? तर मग तुम्हाला बंदिस्त राहून चालणार नाही.

    अहो, इथे थांबला तो संपला.
    मनातली जिगर टिकवायची असेल, तर स्पर्धेला घाबरू नका. आपल्यापेक्षा बलाढ्य शत्रूशी लढा देण्यात खरी मर्दुमकी आहे. त्या शत्रूबरोबर दोन हात करण्यात, गनिमी काव्यानं लढण्यात खरी गंमत असते. अशा लढाईत आपल्या शौर्याचा आणि हिमतीचा कस लागतो. अशा सामन्यात आपण बुद्धी, शक्ती व युक्तीची शस्त्रं पारजून ठामपणे लढतो.

    स्पर्धेचं आणि शर्यतीचं वातावरण आज सर्वत्र दिसतंय. चढाओढीच्या धुंदीनं आज सारे नादावलेले आहेत. या सर्वांना आपण पुरून उरणार आहोत. कदाचित, त्या जपान्यांनाही पुरून उरू आणि भारतीय आर्थिक सत्तेचा झेंडा जगभर फडकू लागेल.

    अर्थात, त्यासाठी चिकाटी, संशोधक वृत्ती हवी, हार न मानण्याची प्रवृत्ती हवी. मग काय आहात ना तय्यार!
    आणि अखेर गोष्ट वाचल्याबद्दल थॅंक्‍यू, धन्यवाद, आभारी आहे, शुक्रिया नाही नाही आरिगातो गोजायमास.

    - डॉ. राजेंद्र बर्वे
    मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई
    drrajendrabarve@gmail.com

     
    • umesh 2:57 pm on जून 14, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      i like your story very much
      thanks.

c
एक नविन पोस्ट तयार करा
j
next post/next comment
k
previous post/previous comment
r
उत्तर द्या.
e
edit
o
प्रतिक्रिया दाखवा/लपवा
t
वर जा
l
go to login
h
show/hide help
esc
cancel