यावर आपले मत नोंदवा

घरचा गणपती २


भाग १ वरून पुढे….

माझ्या सगळ्यात धाकट्या मामाने त्याचे लग्न झाले त्या वर्षापासून घरी दीड दिवस गणपती आणायला सुरूवात केली. त्याने लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाल्यावर ते बंद केले. मलाही खूप वाटायचे की आपल्या घरी सुध्दा गणपती आणावा. अर्थात त्याचे सोवळे – ओवळे किती असते हे त्या वेळी माहीत नव्हते. आम्ही सगळी मामे-मावस भावंडे गणपतीच्या आदल्या दिवसापासून त्या मामाकडे मदतीच्या नावाने जमून धमाल करायचो. आदला दिवस, गणपतीचा दिवस आणि मग विसर्जन म्हणून. दुसरा दिवस ऋषिपंचमीचा, ऋषिच्या भाजीचा बेत आणि घरात बरेच जण जेवायला त्यामुळे मामाने आणलेल्या त्या ढीगभर भाज्या आमची फौज चुटकीसरशी निवडून, चिरून द्यायची. ते सगळे दिवस, ते वातावरण मी आज खूप ‘मिस’ करते. लग्नाचे वय झाल्यावर ; गणपती आणणारे सासर मिळाले तर काय मजा येईल असे वाटायचे. आणि माझ्या इच्छेप्रमाणे सासर गणपती आणाणारेच मिळाले. इतकेच नाही तर ; आमच्याकडे गौरीही येतात म्हणजे बोनसच मिळाला.

आमचा बाप्पा जरी छोटासा असला तरी त्याला लागणा-या सगळ्या वस्तू त्याच्याच सारख्या चांदीच्या आहेत. बाप्पाला आवडणारा मोदक, जास्वंदाचे फूल, केवडयाचे पान, २१ दुर्वांची जुडी, विडा-सुपारी, कलश, श्रीफळ, पाणी प्यायचे तांब्या, फुलपात्र, त्याचे आसन, वर झालर, अगदी त्याचा उंदीरमामा सुध्दा चांदीचा आहे. मोत्याची कंठी, सोन्याचा मुकुट आणी यज्ञोपवीतं यांनी आमचा बाप्पा सजला आहे.

गौरी-गणपती असल्याने बाप्पाचा मुक्काम ठराविक नसतो. ज्या दिवशी गौरी विसर्जन त्या दिवशी त्याला पण निरोप. या वर्षी ७ दिवस गणपती होता. मग तेवढे दिवस घरात रोज काहीतरी गोड असते. पहील्या दिवशी बहुतेक उकडीचे मोदक, मग नंतर फ्रुट सँलँड, गुळाच्या सारणाचे पण तळणीचे मोदक, श्रीखंड, मग गौरी येतील त्या दिवशी गोडाचा शिरा, त्या जेवतील त्या दिवशी तर पुरणा-वरणाचा नैवैद्य असतो. मदतीला कोणी नसल्याने हे सगळे दिवस गडबडीचे जातात खरे पण माहेरवाशिणीचं कौतुक काय होतं असते ते कळायला मुलीला सासरीच जावं लागतं. उगाच नाही साठीची बाई सुध्दा माहेर म्हटलं की कात टाकते. त्यामुळे मी विनातक्रार गौरींचे लाड पुरवते.

आम्ही देशस्थ असल्याने, आमच्या गौरी उभ्या असतात. लाकडाच्या कोठया असतात ; त्यांना साडया नेसवल्या जातात. त्यांचे मुखवटे पितळेचे आहेत. आज जवळ जवळ सव्वाशे वर्ष झाली असतील पण तेच मुखवटे वापरले जात आहेत. ज्या दिवशी गौरी येणार त्या दिवशी ते मुखवटे चिंच लावून स्वच्छ घासून मग पुन्हा रंगवावे लागतात. विसर्जनानंतर ते मुखवटे आम्ही त्याच म्हणजे रंगवलेल्या स्थितीत ठेवतो, याचं कारण म्हणजे असे मानले जाते की वर्षभर गौरींचा घरात वास असतो. घरात घडणा-या गोष्टींवर त्यांची देखरेख असते. जर काही गोष्टी त्यांच्या मनाविरूध्द झाल्या तर त्यांचा निषेध त्या त्यांच्या आगमनाच्या वेळी स्पष्टपणे दाखवून देतात. मी लग्न होऊन आल्यावर माझ्या सासुबाईंनी पहील्याच वर्षी गणपतीच्या वेळी मला हे सांगितले होते. पण माझा त्यावर विश्वास नव्हता. एक तर हे गौरी प्रकरण च मला पूर्णतया नविन होते. माहेरची मी क-हाडे त्यामुळे या कसल्याच गोष्टींची मला माहीती नव्हती. त्यानंतर हळूहळू त्याचा प्रत्यय येत होता. पण २ वर्षांपुर्वी मात्र मला त्यांनी चांगलाच दणका दिला होता. एक तर त्या वर्षी माझी आई अचानक गेल्याने माझी मनस्थिती ठीक नव्हती, त्यातून घरात सतत वाद व्हायला लागले होते. अशातच गणपतीचे आगमन झाले, मी सगळे रितीप्रमाणे करतच होते पण मनाने मात्र त्यात नव्हते. बाप्पाने मला कदाचित माफ केलेही असेल पण आमच्या माहेरवाशिणींनी त्यांचा राग त्यांच्या पध्दतीने व्यक्त केला तेव्हा मात्र मी भानावर आले. त्यांच्या रागाचा प्रत्यय मला कसा आला ते मी इथे लिहीणार नाही. ( अनेक भुवया उंचावलेल्या मला जाणवत आहेत. पण मला प्रचिती आली यातच मला एक संधी मिळाली असे मला वाटते. हा प्रचितीचा भाग व्यक्तिसापेक्ष असावा. )पण यामुळे मला इतर कुठल्याही सणाचे न येणारे टेन्शन गणपतीत हमखास येते.

क्रमशः

भाग ३

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: