यावर आपले मत नोंदवा

अधिक महिना कशासाठी ?


सध्या अधिक महिना चालू आहे. पण अधिक महिना म्हणजे नेमके काय ? तो कसा येतो ? यासंबधिचे प्रश्न आपल्याला पडले असतील तर त्याचे निराकरण इथे होईल.
सकाळ मध्ये आलेले अधिक महिन्यावरचे २ लेख मी इथे वाचकांकरता जोडत आहे.

अधिक महिना कशासाठी?

(हेमंत मोने)
आपले सण आणि उत्सव हे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ इत्यादी महिन्यांशी निगडीत आहेत. विशिष्ट सण म्हणजे विशिष्ट महिना हा संबंध पक्का आहे.
चांद्रमहिने
हे महिने असतात किती? ते केव्हा सुरू होतात? त्यांना अशी विशिष्ट नावे का दिली?
महिने १२ असतात आणि अशा १२ महिन्यांचे एक आवर्तन संपले की वर्ष पूर्ण होते, हे आपल्या मनावर पहिल्यापासूनच ठसले आहे. महिना चैत्र असो की वैशाख, कोणत्याही महिन्याची सुरुवात अमावस्या समाप्तीनंतरच होते. या विधानामुळे तुमच्या मनात आता एक नवीनच प्रश्‍न उद्‌भवला तो “अमावस्या समाप्तीचा.’ अमावस्या समाप्ती ही संकल्पना समजण्यास सोपी आहे. पृथ्वीवरील निरीक्षकाला तारकांच्या पार्श्‍वभूमीवर चंद्र आणि सूर्य एकाच दिशेने सरकताना दिसतात. यातील चंद्राचे सरकणे दोन-तीन दिवसांच्या नुसत्या डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणावरून कोणाच्याही लक्षात येऊ शकेल. या दोघांची गती एकाच दिशेने असली तरी सूर्य धिम्या गतीने सरकतो तर चंद्र जलद सरकतो. परिणामी चंद्र सूर्याला गाठतो आणि पुढे जातो. एका वाहनाने दुसऱ्या वाहनाला ओलांडून जाण्याचाच हा प्रकार आहे. चंद्राने सूर्याला गाठले की, अमावस्या समाप्ती होते. अमावस्या समाप्तीची ही वेळ पंचांगात व अनेक कॅलेंडरमध्ये दिलेली असते. ही वेळ म्हमजेच नवीन चांद्रमहिन्याची सुरुवात असते. अशा लागोपाठच्या दोन अमावस्यांमधील कालावधी म्हणजेच चैत्र, वैशाख इत्यादी नाव धारण केलेला महिना होय. अमावस्या या घटनेचा संबंध चंद्राच्या या विशिष्ट पुनरावर्ती क्रियेमध्ये असल्यामुळे या महिन्यांना “चांद्रमास’ असे म्हणतात.

चांद्रवर्ष
प्रत्येक चांद्रमासाचा कालावधी समान असत नाही, तो विशिष्ट मर्यादेत कमी जास्त होतो. म्हणून चांद्रमासाचा कालावधी सरासरीच्या संदर्भाने सांगितला जातो. चांद्रमास हा सरासरी साडे एकोणतीस (२९.५) दिवसांचा असतो. असे बारा महिने झाले की, एक चांद्रवर्ष संपते. चांद्रवर्षाचा उल्लेख आपण शालिवहन शकाने करतो. त्यास क्रमांक आणि नाव अशा दोन्ही गोष्टी असतात. उदाहरणार्थ १९ मार्च २००७ रोजी गुढीपाडव्याने सुरू झालेले वर्ष शालिवहन शके १९२९ असून “सर्वजित्‌’ असे त्याचे नाव आहे. चंद्राच्या १२ महिन्यांचे वर्ष म्हणजे शालिवाहन शकाचे वर्ष ३५४ दिवसांचेच भरते.

सौर महिने आणि वर्ष
आता आपण दुसऱ्या एका कालगणना प्रकाराकडे वळू. तुमच्या भितींवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च इत्यादी महिने असलेले इ. स. २००७चे कॅलेंडर हा कालगणनेचा दैनंदिन व्यवहारात प्रचलित असलेला आणि म्हणून मुलांपासून मोठ्यांपर्यंत निःशंक माहीत असलेला प्रकार. यामध्ये फक्त सूर्याच्या भ्रमणाचा विचार आहे म्हणून हे सौर कॅलेंडर होय. अर्थात, त्याची अनेक रुपे आपल्याला पहावयास मिळतात. मेष, वृषभ, मिथुन या क्रमाने मीन राशीपर्यंत १२ राशी सर्वांना ठाऊक आहेत. या प्रत्येक राशीतील वास्तव्याचा सूर्याचा कालावधी म्हणजे सौर महिना होय. या महिन्यांनाही वेदकालीन नावे आहेत. उदाहरणार्थ, मेष राशीत सूर्याचा मुक्काम असणाऱ्या महिन्याचे नाव मधु. त्यानंतर माधव अशी स्वतंत्र १२ नावे आहेत.

जानेवारी, फेब्रुवारी हे महिनेही सौर असले तरी एक विशिष्ट महिना म्हणजे विशिष्ट राशीत सूर्याचे वास्तव्य असा प्रकार इंग्रजी कॅलेंडरमध्ये नाही. सूर्याच्या कमी जास्त गतीमुळे प्रत्येक राशीतील सूर्याचा कालावधीही अगदी समान नाही. त्यालाही विशिष्ट मर्यादा आहे. सूर्याचा धनुराशीतील मुक्काम २९ दिवस १० तास ४३ मिनिटे याच्या आसपास असतो. हा लहानात लहान सौर महिना असतो. सूर्याचा मिथुन राशीतील मुक्काम दीर्घ कालावधीचा असतो. तो साधारण ३१ दिवस १० तास ५३ मिनिटांच्या आसपास असतो. अशा तऱ्हेने सौर महिनेही समान कालावधीचे नसतात. म्हणून व्यावहारिक सोयीसाठी ते कधी ३० तर कधी ३१ दिवसाचे घेतात. पण सूर्याचे बरेच महिनेही चांद्रमासापेक्षा मोठे असतात आणि याच गोष्टीचा अधिक महिन्यांशी संबंध पोहोचतो. काहीही असले तरी सर्व सौर महिन्यांच्या कालावधीची बेरीज ३६५ दिवसांच्या आसपास पोहोचते. म्हणजे सौर वर्ष हे चांद्रवर्षापेक्षा मोठे असते.

सौर वर्ष आणि चांद्रवर्ष तुलना
या प्रत्येक वर्षाचे बारा महिने आहेत. त्यातील चांद्रमहिन्यांची नावे प्रचलित असून त्यांची सांगड अमावस्येशी घालून दिली आहे. वेदकालिन सौर महिन्यांची नावे प्रचलित नसली तरी त्यांची सांगड सूर्याच्या राशीसंक्रमणाशी (एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे) घालून दिली आहे. इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडर हे सौर कॅलेंडर असले तरी त्यातील महिन्यांची सुरुवात सूर्यसंक्रमणाशी नाही. ते एक धेडगुजरी कॅलेंडर आहे. ब्रिटीशांमुळे त्याने आपले हातपाय जगभर पसरले आहेत आणि त्यामुळेच ते आपल्याकडील तथाकथित सुशिक्षितांना जवळचे वाटते. वस्तुतः सूर्यसंक्रमणाशी निगडीत असे राष्ट्रीय कॅलेंडर भारताने स्वीकारले असूनसुद्धा ते आपल्याकडील विद्वानांना भावत नाही. असो. सौर चांद्रवर्ष हे त्यातील महिने कमी कालावधीचे असल्याने एकूण ३५४ दिवसांचे आहे, तर सौर वर्ष ३६५ दिवसांचे आहे. दोन वर्षातील या फरकांमुळेच काही समस्या निर्माण झाल्या आहेत.

दोन्ही वर्षीचा मेळ घालण्याची आवश्‍यकता
दिवस रात्र आणि ऋतु हे पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहेत. झोपणे, काम करणे, विश्रांती घेणे असे सर्व दैनंदिन बारीकसारीक व्यवहार दिवस-रात्रीशी निगडीत आहेत. थंडी, उन्हाळा, शेतीची कामे ह्या गोष्टी ऋतुंशी निगडीत आहेत. म्हणन कालगणनेचा प्रश्‍न आला की सूर्याचा म्हणजे सौर कालगणनेचा विचार अपरिहार्य ठरतो. चांद्रमहिने आणि चांद्रवर्षच विचारात घ्यायचे ठरविले तर सण आणि महिने यांचा संबध अबाधित राहील परंतु त्या दोघांची ऋतूशी असलेली सांगड हळुहळू सुटत जाईल आणि हीच खरी समस्या आहे. ही सांगड सुटण्याचे कारण चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा लहान आहे. ते सूर्य वर्षाच्या तुलनेत अगोदर संपते. उदाहरणानेच हा मुद्दा स्पष्ट करूया!

२००५ साली शके १९२७ या चांद्रवर्षाची सुरुवात ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याने झाली. चांद्रवर्ष ३५४ दिवसानंतर संपत असलयामुळे त्याच्या पुढीलवर्षी म्हणजे २००६ साली शके १९२८ हे वर्ष ३० मार्च रोजी आलेल्या पाडव्यापासून सुरू झाले. २००७ साली नव्या चांद्रवर्षाची म्हणजे सर्वाजित्‌ संवत्सर शके १९२९ ची सुरुवात १९ मार्चला झाली. फक्त चांद्रवर्षच पाळायचे ठरविले तर प्रत्येक नव्या वर्षाची सुरुवात मागे मागे सरकेल. एखादे वर्ष ऐन थंडीच्या दिवसात सुरू होईल आणि मग सण महिने, ऋतु या त्रिकुटांतील तिसरा दुवा पहिल्या दोघांशी जुळवून घेणार नाही. केवळ चांद्र वर्ष मानले तर हा मोठाच तोटा आहे. म्हणूनच चांद्र-सौर वर्षामध्ये पडणारी ही कसर भरून काढून काही चांद्रवर्ष मोठी करणे हाच त्यावरचा उपाय आहे. एखादा चांद्रमहिना जादा घेतल्याशिवाय ते शक्‍य नाही. हा जास्तीचा चांद्रमहिना हाच अधिक महिना होय.

अधिक महिन्याची जागा
अधिक महिन्याची आवश्‍यकता समजल्यानंतर अधिक महिना कोणता घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा हे ठरवावे लागेल. हे व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला ठरवावे लागत नाही. सूर्य-चंद्रानीच ती व्यवस्था करून ठेवली आहे. खगोलतज्ज्ञांनी काही संकेत निर्माण करून निसर्गतःच निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन अधिक महिन्याची व्यवस्था केलेली आहे. माणसाच्या विद्वत्तेचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. त्यामुळे चांद्रसौर वर्षाची सांगड घालण्याचे समायोजन तर झालेच, पण ही व्यवस्थाही स्वयंनिर्भर झाली. त्यात व्यक्तीसापेक्षतेचा प्रश्‍नच उद्‌भवला नाही. त्यासाठी सूर्यसंक्रमण आणि चांद्रमहिन्यांची नावे यांचा संबंध पाहू. १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. इंग्रजी महिने सौर असले तरी त्या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या राशीसंक्रमणाशी नाही, हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. सूर्य मकर राशीत असताना जो चांद्रमहिना सुरू होतो तो माघ, असा नियमच पुर्वसुरींनी घालून दिला आहे. याप्रमाणे प्रत्येक चांद्रमहिन्याचे नाव सूर्याच्या राशीसंक्रमणाशी निगडीत केले आहे. याप्रमाणे मीन राशीत सूर्य असताना सुरू होणारा चांद्रमहिना चैत्र, वृषभ राशीत सूर्य असताना सुरू होणारा चांद्रमहिना ज्येष्ठ याप्रमाणे संकेत ठरवून दिला आहे. सूर्याचे विशिष्ट राशीतील वास्तव्य म्हणजे विशिष्ट ऋतु, अशी परिस्थिती असल्यामुळे चांद्रमहिन्याचा संबंध सूर्याच्या विशिष्ट राशीतील वास्तव्याशी जोडला की महिने व ऋतु यांचाही मेळ राहील, हा या नियमामागील उद्देश आहे.

साधारण परिस्थितीत सूर्य संक्रमण आणि अमावस्या एक आड एक घडत राहाते आणि संकेताप्रमाणे महिन्यांचे चक्र चालू राहते. परंतु चांद्रमहिना कमी कालावधीचा असल्यामुळे अमावस्या हळुहळू सूर्यसंक्रमणाच्या तारखेकडे, म्हणजे इंग्रजी महिन्याच्या मध्याकडे सरकत जाते. काही अमावस्यांच्या तारखा देत आहे, यावरून हा मुद्दा स्पष्ट होईल. २३ ऑगस्ट २००६ या तारखेला श्रावण महिन्याची अमावस्या झाली.

त्यानंतर अमावस्येची तारीख मागे सरकत आली. मार्च २००७ मध्ये १९ तारखेला अमावस्या झाली. सूर्याचे राशीसंक्रमण मात्र इंग्रजी महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास घडते. अशा तऱ्हेने संक्रमण आणि अमावस्या अगदी जवळ जवळ आल्या की एक वेगळी परिस्थिती उद्‌भवू शकते. सूर्यसंक्रमण होऊ? लगेच अमावस्या होते. दोन लगतच्या अमावस्यांमधील कालावधी म्हणजे चांद्रमहिना लहान असल्याने आणि संक्रमण महिना म्हणजे सौर महिना मोठा असल्यामुळे पुढची अमावस्या झाली तरी सूर्यसंक्रमण झालेले नसते. ते अमावस्येनंतर लगेच घडते. म्हणजे दोन लागोपाठच्या अमावस्या सूर्याच्या राशी संक्रमणाशिवाय घडतात आणि त्यामुळे या सूर्यसंक्रमण न झालेल्या महिन्याला क्रमाने येणाऱ्या पुढच्या महिन्याचे नाव देता येत नाही. परिणामी दोन महिने एकच नाव धारण करतात आणि एक महिना आपोआपच जादा होऊन चांद्रवर्ष १३ महिन्यांचे होते.

यंदाची परिस्थिती
आता वर वर्णन केलेली परिस्थिती यंदा कशी उद्‌भवली आहे ते पाहू. १५ मे २००७ रोजी सकाळी ९ वा. १८ मिनिटांनी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. अमावस्या गुरुवार दि. १७ मे रोजी रात्री ०.५७ वाजता संपते व पुढील महिना सुरू होतो. वृषभ राशीत सूर्य असताना सुरू होणारा चांद्र महिना ज्येष्ठ या संकेतानुसार १७ मे रोजी सुरू होणारा महिना ज्येष्ठ ठरतो. यानंतरची अमावस्या शुक्रवार, दि. १५ जून २००७ रोजी सकाळी संपते व नवीन चांद्रमहिना सुरू होतो. हा खरे तर आषाढ असला पाहिजे. परंतु त्यासाठी सूर्य मिथुन राशीत असणे आवश्‍यक आहे. सूर्याने १५ जून रोजी खरोखरच मिथुन राशीत प्रवेश केला आहे, पण तो अमावस्या संपल्यानंतर जवळजवळ सात तासांनी. तांत्रिकदृष्ट्या अमावस्या समाप्तीच्या वेळी सूर्य वृषभ राशीतच आहे म्हणून पुढच्याही महिन्याचे नाव ज्येष्ठ ठेवणे भाग आहे. अशा तऱ्हेने दोन लागोपाठचे महिने “ज्येष्ठ’ ठरतील. त्यापैकी १७ मे ते १५ जून हा पहिला महिना अधिक ज्येष्ठ आणि १६ जून २००७ ते १४ जुलै २००७ हा चांद्रमहिना निज ज्येष्ठ म्हणजे नेहमीचा ज्येष्ठ ठरले. थोडक्‍यात, लागोपाठच्या दोन अमावस्यांमध्ये सूर्याचे संक्रमण म्हणजे राशीबद्दल घडून आला नाही तर तो अधिक ठरतो; म्हणूनच या महिन्याला असंक्रांत महिना म्हणतात. चांद्रमहिना लहान असल्यामुळे तो सूर्याच्या राश्‍यांतर म्हणजे संक्रमणाच्या महिन्यामध्ये सामावला जाण्याची ही क्रिया संकलीत परिणाम म्हणून घडून आली आहे. ती मुद्दाम घडवून आणावी लागली नाही. म्हणूनच अधिक महिना घडवून आणण्याची परिस्थिती मानवनिर्मित नसून नैसर्गिकच आहे, असे वर विधान केले होते.

अधिक महिने कोणते होतात
सूर्याचा राशीप्रवेश (यालाच संक्रमण किंवा संक्रात म्हणतात) आणि अमावस्या अगदी निकट आल्या तर सौर महिन्याच्या पोटात चांद्रमहिना सामावला जाण्याची शक्‍यता सूर्य कुंभ ते कन्या राशीत असताना असते. म्हणजेच फाल्गुन ते अश्‍विन हे महिने अधिक येण्याची शक्‍यता जास्त असते. कार्तिक हा महिनाही अधिक किंवा क्षय महिना म्हणून येऊ शकतो. लागोपाठच्या दोन अमावस्यांच्या दरम्यान सूर्याचा राशीबद्दल दोन वेळा झाल्यास क्षय महिना होतो. मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यांवर “अधिक’ होण्याची वेळ येत नाही. क्वचित “क्षय’ होण्याची पाळी येते. “माघ’ महिना मात्र अशा कोणत्याच प्रकारात मोडत नाही. अधिक महिना म्हणून आपले अस्तित्व व्यक्त करण्याची पाळी श्रावण, ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यांवर बहुतांश वेळा येते. एकदा एखादा महिना अधिक आला की पुन्हा १९ वर्षांनी तो महिना अधिक होतो असे सर्वसामान्यपणे आढळते. परंतु श्रावण आणि ज्येष्ठ महिन्यांच्या बाबतीत ही वेळ ११ वर्षांनी व त्यानंतर लगेच ८ वर्षांनीही येऊ शकते. इ.स. १९८० नंतर लगेच १९८८ साली ज्येष्ठ महिना अधिक आला होता. त्यानंतर ११ वर्षांनी १९९९ साली तो पुन्हा अधिक महिना म्हणून आला. तेव्हापासून एक आड एक आठ आणि अकरा वर्षांनी अधिक होण्याचा मान त्याला मिळत आहे. हा क्रम २०४५ पर्यंत चालू राहील. इ.स. १७६० ते २१५६ या प्रदीर्घ कालावधीत एकंदर १४८ वेळा जादा महिने येणार आहेत. त्यामध्ये अधिक होण्याचा मान ज्येष्ठ महिन्याला एकूण २९ वेळा मिळणार आहे. यानंतर २०१० साली वैशाख व २०१२ साली भाद्रपद हे महिने अधिक असतील. अधिक महिना होण्याची परिस्थिती किमान २८ चांद्रमहिने किंवा कमाल ३५ चांद्रमहिन्यांनंतर उद्‌भवते.

अधिक महिन्याचे वर्ष कसे ओळखावे
१) शक वर्षाच्या क्रमांक दर्शविणाऱ्या संख्येला १२ने गुणून १९ ने भागावे. जर बाकी ९ किंवा ९ पेक्षा कमी आली तर त्यावर्षी अधिक महिना येणार असे समजावे. उदा. शके १९२९ या संख्येला १२ ने गुणून १९ ने भागले तर बाकी ६ येते. म्हणजे या वर्षी अधिक महिना आहे हे नक्की झाले.

२) जर गुढीपाडवा १५ मार्च ते २४ मार्चच्या दरम्यान असेल तर त्यासंबंधित वर्षी अधिक महिना येतोच. गुढीपाडव्याची तारीख २४ मार्चनंतर येत असेल तर त्या वर्षी अधिक महिना नाही असे समजावे.

अधिक महिना हा विष्णूचा महिना मानण्यात आल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्यामुळे अधिक महिन्यातील एकादशीला “कमला’ एकादशी म्हणतात.

अधिक महिन्याची गरज आणि तो घेण्याची व्यवस्था या गोष्टी सामान्यपणे अनेकांपर्यंत पोहोचत नाहीत. बाकी गोष्टी पोहोचतात. म्हणूनच हा इतका सविस्तर लेख!

अधिक महिना कसा आला त्याचे स्पष्टीकरण आकृतीने पुढीलप्रमाणे देता येईल.
१ दि. १५ तास ३१ मि. २९ दिवस ७ तास ४६ मि. ७ तास १० मि.
सूर्यसंक्रमण अमावस्या १ अधिक महिना अमावस्या २ सूर्यसंक्रमण
(वृषभ) (मिथुन)
************

पुरुषोत्तम मासाचा महिमा

( ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर )
या वर्षी गुरुवार, १७ मेपासून शुक्रवार, १५ जूनपर्यंत अधिक ज्येष्ठ महिना आहे. अधिक महिन्याला “पुरुषोत्तममास’, “मलमास’ अशी आणखीही काही नावे आहेत. अधिक महिना हे काय आहे? आपल्या कालगणनेप्रमाणे तीन वर्षांतून एकदा येणारा हा अधिक महिना तेरावा महिना आहे. आपल्याकडे ज्या विविध कालगणना रूढ आहेत, त्यापैकी शालिवाहन शकाची जी परंपरागत कालगणना आहे, ती जास्तीत जास्त निर्दोष व्हावी म्हणून पूर्वाचार्यांनी अधिकाधिक दक्षता घेतली आहे. ……..
अधिक महिना का येतो?
आपल्याकडे सौरमान आणि चांद्रमान अशा दोन प्रकारच्या कालगणना आहेत. सौरमानाचे वर्ष ३६५ दिवसांचे असते आणि चांद्रमानाचे वर्ष साधारणतः ३५४ दिवसांचे असते. सूर्याची गती एक महिन्याला एक राशी याप्रमाणे असते, तर तेवढेच अंतर चालण्यास चंद्राला २९ दिवस १२ तास आणि ४४ मिनिटे एवढा वेळ लागतो. सौरमान आणि चांद्रमान या कालगणनांप्रमाणे सौरवर्ष ३६५ दिवसांचे आणि चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे होत असल्याने या दोन्ही कालगणनांत प्रत्येक वर्षी ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक तीन वर्षांत ३३ दिवसांचा होईल. तो टाळण्यासाठी ही अधिक मासाची योजना आहे.

आपल्याकडच्या प्रत्येक महिन्याचे नाव नक्षत्रनामाधिष्ठित आहे. या पद्धतीत अधिक महिन्याला नाव मिळाले नाही. तो हिरमुसला आणि भगवान विष्णूकडे गेला. विष्णूने त्याची नाराजी ओळखली आणि त्याला म्हटले, “चल, माझेच नाव मी तुला देतो.’ आणि तो महिना “पुरुषोत्तमास’ म्हणून ओळखला जाऊ लागला. “पुरुषोत्तम’ म्हणजे “विष्णू.’

शालिवाहन शकाची पद्धती ही फार प्राचीन आहे. म्हणजे महाभारताच्या आधीच्या काळापासून आहे. फक्त शालिवाहनाने आक्रमक शकांवर विजय मिळविला आणि जुन्या पद्धतीची कालगणना आपल्या नावाने नव्याने प्रचलित केली. जसा शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वतःच्या नावाचा शक सुरू केला तसाच शालिवाहनाने १९२९ वर्षांपूर्वी आपल्या नावाचा शक सुरू केला. प्रत्येक वर्षाचे बारा महिने असतात. आपला भारतीय हिंदू पद्धतीचा महिना महाराष्ट्रात शुक्‍ल प्रतिपदेला आणि उत्तर भारतात कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. या प्रत्येक महिन्यात सूर्य पुढल्या राशीत जातो. तो ज्या महिन्यात पुढल्या राशीत जात नाही, तो अधिक महिना मानण्यात येतो.

हा महिना पुण्यप्रद समजला जातो. या महिन्यात केलेली धर्मकृत्ये, दान, जप इत्यादी अधिक पुण्यप्रद आहेत, असे समजले जाते. या महिन्यात जावयाला विष्णूच्या जागी मानून त्याचा आदर करण्याची प्रथा आहे. जावयाला तेहेत्तीस अनारसे किंवा मेसुराचे तुकडे अशी सच्छिद्र मिठाई देण्याची पूर्वापार रुढी आहे. महिन्याचे नाव “पुरुषोत्तम’ आणि जावई म्हणजे “विष्णूचा अंश’ अशी भावना त्यामागे असावी.

**********

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: