2 प्रतिक्रिया

अशी होते राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक


राष्ट्रपती कसे निवडले जातात याबद्दल आपल्यापैकी कुणाला माहिती आहे. सकाळ मध्ये प्रकाशित झालेला हा लेख सभासदांच्या माहितीकरता देत आहे.

(भगवान गुजर)
राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा पाच वर्षांचा पदावधी २४ जुलै २००७ रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरिता घेतली जाणारी निवडणूक तेरावी असेल.
ही निवडणूक प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वावर होत नसल्यामुळे तीत सामान्य लोकांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. घटनेनुसार या निवडणुकीची प्रक्रिया ता. २४ जुलैपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यानुसार पुढील महिन्यात निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होईल. निवडणूक आयोगाकडून अधिसूचना यंदाच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून लोकसभेचे महासचिव असतील, तसेच सहनिर्वाचन अधिकारी म्हणून लोकसभा सचिवालयातील एक वरिष्ठ अधिकारी व राज्य विधानसभांचे सचिव असतील.

राष्ट्रपतिपदासाठी भारताचे नागरिकत्व, वयाची पस्तीस वर्षे पूर्ण, लोकसभेचा सदस्य बनण्याची अर्हता व लाभाच्या पदावर नसणे या किमान अटी आहेत. याखेरीज उमेदवारास नामांकन अर्जावर सूचक म्हणून किमान पन्नास व अनुमोदक म्हणून अन्य किमान पन्नास अशा शंभर मतदारांच्या सह्या असणे व पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्‍यक आहे. एका उमेदवारातर्फे जास्तीत जास्त चार नामांकन पत्रे दाखल करता येतात. मात्र, एक मतदार सूचक अथवा अनुमोदक या नात्याने फक्त एकाच नामांकन पत्रावर सही करू शकतो. थोडक्‍यात तो फक्त एकाच उमेदवारास पुरस्कृत करू शकतो. या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा व राज्य विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मतदार असतात. त्यानुसार २८ राज्ये व दिल्ली व पॉंडिचेरी हे दोन केंद्रशासित प्रदेश (ज्यांना राष्ट्रपती निवडणुकीपुरता राज्याचा दर्जा दिला गेला आहे) यांच्या विधानसभांचे ४१२०, लोकसभेचे ५४३ व राज्यसभेचे २३३ अशा निवडून आलेल्या एकूण ४८९६ मतदारांच्या निर्वाचन गणाकडून (इलेक्‍टोरल कॉलेज) राष्ट्रपतींची निवड केली जाते. ज्या राज्यात विधान परिषदा आहेत त्यांचे, तसेच राज्यसभेचे बारा नामनिर्देशित आणि लोकसभा व काही राज्य विधानसभा यांतील नामनिर्देशित आंग्लभारतीय सदस्य यांना मतदानात भाग घेता येत नाही.

घटनेने राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निरनिराळ्या राज्यांना समसमान प्रतिनिधित्व दिले आहे. राज्यांमध्ये परस्परांत समानता, तसेच सर्व राज्ये मिळून व संघराज्य यांच्यात तुल्यता साधण्यासाठी विधानसभेच्या व संसदेच्या प्रत्येक निवडणूक आलेल्या सदस्यास किती मत देता येतील हे एका सूत्रानुसार निर्धारित केले आहे. ते सूत्र असे ः (१) राज्याच्या लोकसंख्येला त्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या भागाकारात एक हजाराच्या जितक्‍या पटी असतील तितकी मते त्या विधानसभेच्या सदस्याची असतात. या हिशेबात शेष संख्या पाचशेपेक्षा जास्त असल्यास मतात एकाची वाढ केली जाते. (२) निवडून आलेल्या प्रत्येक लोकसभा व राज्यसभा सदस्यास (१) प्रमाणे आलेल्या राज्यांच्या विधानसभांच्या सदस्यांच्या मतांच्या एकूण संख्येस निवडून आलेल्या संसद सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येईल तितकी मते. अर्ध्याहून जास्त असलेले अपूर्णांक हे पूर्णांक म्हणून गणावयाचे व इतर सोडून द्यावयाचे. हे सूत्र पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल –

महाराष्ट्र – लोकसंख्या (१९७१ जनगणनेनुसार) – ५,०४,१२,२३५
विधानसभेचे आमदार – २८८
प्रत्येक आमदाराची मते – ५,०४,१२,२३५/२८८ x १००० = १७५
एकंदर मत-संख्या ः १७५ x २८८ = ५०,४००
अशा प्रकारे ३० राज्य विधानसभांच्या ४१२० सदस्यांची मतसंख्या होते – ५,४९,४७४. त्यावरून संसद सदस्यांचे मत-मूल्य पुढीलप्रमाणे निघते – संसदसदस्य संख्या – लोकसभा ५४३ + राज्यसभा २३३ = ७७६
प्रत्येक सदस्याचे मतमूल्य – ५,४९,४७४/ ७७६ = ७०८
खासदारांची एकंदर मते – ७०८ x ७७६ = ५,४९,४०८
आमदार व खासदार यांची एकूण मतसंख्या – ५,४९,४७४ + ५,४९,४०८ = १०,९८,८८२

या उदाहरणात १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या धरली आहे, कारण ८४ व्या घटनादुरुस्तीनुसार येत्या जवळजवळ पंचवीस वर्षांपर्यंत हीच संख्या निवडणुकीसाठी स्थिर मानली जाणार आहे. परिगणनेवरून हेही दिसून येईल, की लोकसंख्या परिमाण लावून राज्यात परस्पर समानता व एकूण विधानसभांची मते व संसदेची मते यात जवळजवळ तुल्यता साधली गेली आहे. प्रत्येक आमदाराची व खासदाराची मते त्यांच्या मतपत्रिकेवर नोंदलेली असतात.

राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रामणीय मताद्वारे घेतली जाते आणि मतदान गुप्त असते. या पद्धतीनुसार प्रत्येक मतदारास १, २, ३, ….. या क्रमाने मतपत्रिकेवर उमेदवाराची पसंती दाखविता येते. मत ग्राह्य ठरण्यासाठी किमान एक तरी पसंती “१’ लिहून दाखविणे आवश्‍यक असते. हा आकडा अंकात न लिहिल्यास अथवा शब्दात (एक) लिहिल्यास अथवा नुसती फुली (ु) मारल्यास मत रद्द होते. निवडून येण्यासाठी उमेदवाराला किमान मतांची आवश्‍यकता असते. त्यास “कोटा’ म्हणतात. सर्व उमेदवारांच्या एकंदर ग्राह्य मतांना दोनने भागून जो भागाकार येईल तो एकाने वाढवून जी संख्या येईल तो “कोटा.’ उदाहरणार्थ सर्व उमेदवारांच्या ग्राह्य मतांचे एकंदर मूल्य दहा हजार असेल, तर “कोटा’ होईल १०,०००/२ + १ = ५००१.

सामान्य भाषेत याचा अर्थ असा, की निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला एकूण मतांपैकी किमान पन्नास टक्के अधिक एक इतकी मते मिळालीच पाहिजेत. ती मिळताच उमेदवार पहिल्या फेरीतच विजयी घोषित केला जातो अन्यथा सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारास बाद करून त्याची दुसऱ्या, तिसऱ्या इत्यादी पसंतीची मते उरलेल्या उमेदवारांच्या खात्यात जमा केली जातात. ही प्रक्रिया अंततः एक तरी उमेदवार निवडून येईपर्यंत चालू राहते. मग त्यास “कोटा’ मिळो अथवा न मिळो. १९६९ मध्ये अशाच प्रक्रियेने व्ही. व्ही. गिरी यांची नवव्या फेरीत निवड झाली होती. ज्या उमेदवारास कोट्याच्या एक षष्ठांशाहून कमी मते मिळतील व तो निवडून आला नाही तर त्याची अनामत रक्कम जप्त होते. यावरून मतांची संख्या व “कोटा’ प्राप्त करण्याची क्षमता हे निवडणुकीचे महत्त्वाचे निकष आहेत हे निश्‍चित. यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार बाजी मारेल हे राज्यांच्या विधानसभा व संसद यांतील पक्षीय संख्याबळावर ठरते.

(लेखक १९९२ च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सहनिर्वाचन अधिकारी होते.)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “अशी होते राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक

  1. yes, Sujit i have visited and signed the petiotion too. Thanx taking time for such a good cause.

  2. Sir, Dhanyawad..Kahrach Khupach Changli aani wistrut mahiti dili aahe aapan.
    maza ek choto sa upakram aahe to aapan pahawa.
    http://www.petitiononline.com/apj
    Thanks a Ton Once again..!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: