5 प्रतिक्रिया

वर्षपूर्तीच्या निमित्ताने..


बरोबर वर्षापूर्वी आजच्या दिवशी मी हा ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. त्यावेळी ब्लॉग म्हणजे काय ? त्याची व्याप्ती किती ? तॊ कोणी वाचेल की नाही याबद्दल इतक्या शंका मनात होत्या! पण माझ्या पहिल्याच पोस्टवर मला ‘विदग्ध’ कार शैलेश खांडेकरांचे मराठी ब्लॉगविश्वात पदार्पण केल्याबद्दल चे अभिनंदन करणारे ई पत्र मिळाले. हे कोण ? याचा विचार करत मी त्यांनी दिलेल्या मराठी ब्लॉगविश्व.नेट च्या दुव्या वर टिचकी मारली; आणि तिथेच मराठी ब्लॉग्स च्या पसा-यात हरवून गेले. त्यावेळी संपूर्णपणे  मराठी ब्लॉग्सची संख्या १५० च्या आसपास होती आता ती दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. एवढे मराठी ब्लॉग इथे अस्तित्वात असतील असे मला वाटलेच नव्हते. ब्लॉगविश्व च्या मुखपृष्ठावरच मला ‘शैलेश खांडेकर’ कोण याचा शोध लागला. त्यांच्या ‘पामरस्मॄती’ या ब्लॉगला त्यावेळी नुकताच प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता. ते वाचले आणि माझे धाबे च दणाणले. मनात आलं की आपण विचार करत होतो आपला ब्लॉग कोणी वाचेल की नाही याचा, पण जगाच्या कुठल्यातरी कोप-यात कोणीतरी( ? साक्षात प्रथम पुरस्कार विजेते )  या ब्लॉगची दखल घेत आहे. याचाच अर्थ काही उलट-सुलट लिहून चालणार नाही.

अर्थात उलट-सुलट काही लिहायचं नव्हतंच हो. पण मुळात विषय दिल्याशिवाय लिहायची सवय नसल्याने असं निरूद्देश काय लिहिणार ? मग ठरवलं की माझ्या महाविदयालयीन काळातल्या जपून ठेवलेल्या सगळ्या डाय-या इथे मांडायच्या. त्यात प्रामुख्याने होते विविध पुस्तकातून आवडलेले उतारे आणि त्या वेळी आवडून गेलेल्या पण आता भंपक वाटणा-या खूपश्या कविता. चला ! काय लिहायचं हा प्रश्न सुटला पण आता मी लिहिलेल्या पोस्ट कितीजणं आणि कुठुन म्हणजे जगाच्या कोणत्या कोप-यातून वाचतात याचा शोध घ्यायचा जणू चाळाच लागला. माझा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांच्या नजरेस यावा ही सदिच्छा बाळगून मी रोज नित्यनेमाने माझ्या ब्लॉगचे स्टँट्स तपासत असे. त्यावेळी वर्डप्रेस ने मराठी ही भाषा म्हणून त्यांच्या यादीत समाविष्ट केली नव्हती पण हिंदी चा समावेश झाला होता. मला वाटले की हिंदी काय आणि देवनागरी काय लिहिताना सारखेच लिहिले जातात; त्यामुळे माझी भाषेची निवड मी हिंदी म्हणून केली. आणि इथेच थोडा घोळ झाला. मी भाषेची निवड हिंदी केल्याने माझा ब्लॉग हिंदी कँटँगरीत गेला, या वेळेपावेतो माझा ब्लॉग चांगला वाचनात येऊ लागला होता. त्यामुळे त्या दिवसात टॉप हिंदी ब्लॉग म्हणून पहिल्या ५ ब्लॉगमध्ये ‘माझी मराठी’ दिसू लागला. पण त्यामुळेच एका हिंदी ब्लॉगकर्त्या कडून मला भाषेची निवड बदलण्याकरता सज्जड दम मिळाला. कदाचित माझ्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत बाधा येत असेल हा सुज्ञ विचार करून मी वाद न वाढवता त्याचा सल्ला मुकाट ऎकला आणि भाषा इंग्रजी म्हणून निवडली.

पण, मित्र-मैत्रिणींनो आता ती परीस्थिती राहिली नाहीये. वर्डप्रेसने नुकतेच आपल्या मायमराठी ला एक ब्लॉगिंगची भाषा म्हणून स्थान दिले आहे. त्यामुळे आता सध्या वर्डप्रेसवरचा मराठीतला एक प्रमुख ब्लॉग म्हणून विदग्ध खालोखाल ‘माझी मराठी’ चा बोलबाला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या व्यतिरीक्त जवळ जवळ २३ हजारपेक्षा जास्त लोकांनी या ब्लॉगला भेटी दिल्या आहेत. कदाचित माझे हे अढळपद एक तर वर्डप्रेस वर फार थॊडे मराठी ब्लॉग असल्यामुळे असेल किंवा मराठी ब्लॉग असले तरी त्यांनी अजून भाषेची निवड इंग्रजी वरून बदलून मराठी न केल्याने असेल नाहीतर ब्लॉगर च्या ब्लॉगर्स पुढे माझा काय पाड ? उदाहरणच दयायचे तर मी आवर्जून वाचते त्या ब्लॉगची यादी पहा. वर्डप्रेस वरचा विद्गध ( प्राज्ञ भाषा ), याहू वरचा आनंदघन ( वर्णनात्मक ) आणि ब्लॉगर वरचे ट्युलिप( ओघवती भाषा) , प्रियभाषिणी (सहज) , धोंडोपंत ( खुसखुशीत ), माधव शिरवळकर ( तंत्रज्ञान ) , अनुराधा कुलकर्णी ( खुसखुशीत) यांचे ब्लॉग्स मी न चुकता वाचते. अजूनही काही सागरस्मॄती, चैतन्य देशपांडे च्या विज्ञानकथा, पारीजात सारखे ही ब्लॉग्स वाचते पण ते तुलनात्मकदॄष्ट्या नवे आहेत.

माझ्या ब्लॉगच्या वाटचालीचे श्रेय मी मुख्यत्वेकरून मराठी ब्लॉगविश्व .नेट ला देऊ इच्छिते. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय इतक्या मोठया  समुदायापर्यंत पोचणे अशक्यप्राय होते. कोणाचाही लेख ब्लॉगवर प्रकाशित झाला की लगेच आर.एस.एस. फीड द्वारे मराठी ब्लॉग्विश्व.नेट वरही त्याची झलक दाखवली जाते. तिथली  वाचकसंख्या जास्त असल्याने एकाच वेळी तो अनेकजणांपर्यत पोचतो. या कारणाने जास्तीत जास्त वाचक मला मराठी ब्लॉगविश्व मार्फत लाभले.

या व्यतिरीक्त मला जे वाचक लाभले ते बहुतेक रिकाम्या वेळी काहीतरी सर्च करतात ते. एक खंत अशी वाटते की बहुतेक सर्च हा एक तर मराठी विनोद, मराठी प्रेम कविता इथपर्यंतच सिमित आहे. माझ्या  ब्लॉगच्या नावातच मराठी असल्याने मराठी ***** असे जोडून काहीही सर्च केले असता माझा ब्लॉग त्यात असणारच, पण वाचकांची गाडी विनोद, जोक्स, प्रेम कविता यांच्यापुढे जात नाही याचे वाईट वाटते. खरे तर माझ्या ब्लॉगवर मी माझे शब्द वरून उतरवून घेतलेली कींवा मीच तिथे दिलेली काही मराठी पुस्तके ईबुक्स च्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. पण ‘सर्च’क वाचक एका ठराविक पातळीच्या पुढे जात नाहीत असे दिसते.

असो, वाचकांनी त्यांना माझ्या ब्लॉगकडून काय अपेक्षा आहेत ते सांगितल्या तर मला सुधारणांना वाव मिळेल. मला जमेल त्या पध्दतीने मी माझे विचार वाचकांवर न लादता जे आधीच मराठीत मांडले गेले आहे ते इथे देण्याचा प्रयत्न करत राहीन. किंबहुना कागदावर प्रकाशित झालेला प्रत्येक मराठी शब्द हा या डिजिटल फॉर्म मध्ये करणे आणि तो वाचकांना मोफत उपलब्ध असणे हे माझे एक स्वप्न आहे.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “वर्षपूर्तीच्या निमित्ताने..

 1. वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करावा अशी प्रेरणा होत आहे.

 2. अभिनंदन!
  वर्षपूर्तीबद्दल आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठल्याबद्दलही अभिनंदन!
  हे ह्यापुढेही असेच सुरु राहावे हीच शुभेच्छा!

 3. माफ करा, काहीतरी गडबड झाली असावी. आणि शुभेच्छाबद्दल धन्यवाद

 4. माझी दुनिया,

  वर्षपूर्तीसाठी आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! खुलासा – पामरस्मृती ही अनुदिनी पामर यांची आहे. माझी नाही, 🙂
  तुमची लिहायची शैली छान आहे. असेच लिहीत रहा.

  शुभेच्छुक,

  शैलेश

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: