3 प्रतिक्रिया

एकदा काय झालं


एकदा काय झालं
( डॉ. राजेंद्र बर्वे )
आयुष्यातली गहन रहस्यं शिकण्यासाठी झेन गुरूंच्या अत्यंत साध्या गोष्टी वाचाव्यात. वाचता वाचता आपण दचकतो; कारण पुढे काय असं वाटू लागतं तेव्हा गोष्ट संपलेली असते. “अरेच्चा!’ असं म्हणून आपण चक्रावतो. परंतु त्या गोष्टी मनात रेंगाळतात आणि कधीतरी निळ्याभोर आकाशात वीज चमकावी तसा त्या गोष्टींचा गूढ अर्थ आकळतो. मन त्या ज्ञानरूपी लख्ख प्रकाशानं उजळतं… ……..
गोष्टी फक्त राजाराणी, सरदार- दरकदार आणि मनसबदारांच्याच का असाव्यात? म्हणजे असू नयेत, असं नाही. गोष्टी माणसांच्या असतात, जिवंत वस्तुमात्रांच्या असतात, त्यांच्या अनुभवांच्या असतात. राजाराण्या आणि अमिरांच्या, सुलतानांच्या, बादशहांच्या गोष्टी कोणीतरी लिहितात, त्यांची जपणूक होते. सर्वसामान्य माणसांच्या गोष्टींची अशी दखल घेतली जाते असं नाही. पण खऱ्या गोष्टी त्यांच्याच असतात. त्या अस्सल असतात. आतल्या असतात आणि पुन्हा पुन्हा आठवतात.
झेन गोष्टी अशाच असतात. तुमच्या माझ्यासारख्या माणसांच्या असतात. तशीच ही गोष्ट आहे मूळ जपानची. जपानमधल्या तीन-चारशे वर्षांपूर्वीची आहे. एका सर्वसामान्य माणसाची.
तो एक साधक होता. निर्वाणाच्या ध्यासानं नादावलेला होता. त्याची एकच इच्छा- मुक्तीचा क्षण अनुभवायचा. मुक्ती शारीरिक आणि सांसारिक जंजाळातून. देहाला चिकटलेल्या आणि मनाला गुंतवून टाकणाऱ्या मायेतून. त्या मायेतून त्याला सुटका हवी होती. त्याला कुणी सांगितलं, की तू झेन गुरूंकडे जा; तेच तुला मार्ग दाखवतील. त्यांच्याकडे या मायामहालातून निसटण्याच्या महाद्वाराच्या चाव्या असतात. त्यांच्याकडे जाऊन काही मागितलं तर नक्कीच तुला मार्ग सापडेल. तो “बरं’ असं म्हणून झेन गुरूंच्या आश्रमात पोचला. झेन गुरू तिथं जणू राज्य करायचे. त्यांनी आखून दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी तिथले साधक करीत. त्यांच्यापैकी काही एके जागी स्थिर बसून ध्यान करायचे, तर कोणी डोळे मिटून फक्त श्‍वास मोजायचे. कोणी जंगलात भटकायचे. अधूनमधून झेन गुरू आपल्या साधकांशी संवाद करायचे.
गुरू त्यांना पुढील मंत्र देऊन बैठका संपत. आपला साधक तिथं वावरत असायचा. त्याच्या कानावर विविध शब्द पडत. नासिकाग्रावर चित्त एकाग्र केल्यावर जाणवणाऱ्या शारीरिक जाणिवा, मनात उद्‌भवणारी आणि शरीरावर पसरणारी स्पंदनं यावर ते साधक आपापसांत बोलत. झेन गुरू शांतपणे ऐकत, मंद स्मित करीत आणि त्यांच्या त्या स्मितरेषेमुळे सारं वातावरण भरून जायचं. या साऱ्या दूरच्या नि परक्‍या अनुभवानं तो साधक भारावून जायचा. त्याला उत्सुकता वाटायची- असे अनुभव मला येतील का, कधी येतील, कसे येतील, कसे आणावेत या प्रश्‍नांनी तो तळमळत असे. त्याला रात्र रात्र झोप लागत नसे.
अशा वेळी तो उठून बसे. आपल्या कुटीबाहेर येऊन नीरव शांततेचा अनुभव घेत असे. सर्वत्र निजानीज झालेली… वाऱ्याच्या मंद झुळका… अधूनमधून झाडांवरून गळणारी पानं आणि लपूनछपून आपल्या जोडीदाराचा शोध घेणाऱ्या पक्ष्यांच्या हाका… यातूनच काय तो चराचराच्या जिवंततेचा एहसास व्हायचा.
त्या नजाऱ्यावर नि तिथल्या स्वरस्पंदनावर त्याचं प्रेम बसलं. दिवसभरातल्या श्रमांतून त्याला त्या वेळी आराम मिळायचा. कुटीच्या दरवाजापाशी एका बाजूला एक मडकं ठेवलेलं असायचं. त्या मडक्‍यातल्या नितळ पाण्यात रात्री चंद्राचं प्रतिबिंब पडायचं. त्या साधकाला मडक्‍याच्या तोंडातून दिसणाऱ्या काळ्याभोर पाण्याचं वर्तुळ आणि त्यात दिसणारं चंद्रबिंब यांचा मोह पडायचा. त्या चंद्रबिंबाकडे तो पाहत राहायचा. चंद्राच्या पिवळसर तेजस्वी बिंबाच्या दिमाखदार प्रतिमेवर त्याचा जीव जडला होता. चंद्राच्या दिवसागणिक वर्धिष्णू होणाऱ्या कला पाहण्यासाठी तो मध्यरात्री उठायचा. त्याला दिवसभर उत्सुकता लागायची, आज रात्री मडक्‍यातल्या पाण्यात दिसणारा चंद्र कसा असेल? एके दिवशी तो साधक गुरूपाशी गेला आणि म्हणाला, “”कधी मिळणार मला मुक्ती? कधी अनुभवणार मी निर्वाण?”
गुरू त्याच्याकडे पाहून मंद हसले. त्यांना साधकाच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता नि कपाळावरचं आठ्यांचं सूक्ष्म जाळं दिसलं. त्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.
साधकाच्या हृदयाचे ठोके वाढले. हाच तो क्षण, याच क्षणाची मी वाट पाहत होतो. आज मला तो मंत्र मिळणार, आज मला ती “गुरुकिल्ली’ लाभणार! गुरूनं त्याच्याकडे पाहून म्हटलं, “”निर्वाण हवंय ना, मग तुझ्या दरवाजातल्या त्या मडक्‍यातून पाणी भर जा…” साधक बावचळला. मला हवा होता मंत्र, मला हवा होता साधनेचा मार्ग…
निराश होत्साता तो निघाला. त्याला आपल्या दरवाजापाशी ठेवलेलं मडकं आठवलं. त्याचा आकार, घाट आणि त्यात पडणारं चंद्राचं प्रतिबिंब सगळं आठवलं.
दीर्घ सुस्कारा सोडून त्यानं मडकं उचललं आणि निघाला. त्याच्या कुटीला वळसा घालून उतरलं, की तलाव होता. त्यातून पाणी भरायचं. इतके दिवस कोणीतरी त्या मडक्‍यात पाणी भरायचा. आजपासून हे काम मी करणार आहे! गुरूंची इच्छा म्हणजे आज्ञा…
काही दिवस उलटले. साधकाचं नित्य कर्म निश्‍चित झालं. वाटेवरच्या वळणावरचं ते उंच झाड, त्या झाडावरचं घरटं, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, फुलांवर घुटमळणारे भुंगे आणि फुलपाखरं यावर त्याचं मन जडलं.
एकदा काय झालं, पाण्यानं भरलेलं मडकं घेऊन येणाऱ्या साधकाला ठेच लागली. त्यानं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला; पण पाय निसटलाच आणि मडकं फुटलं. मडक्‍याच्या खापराचे तुकडे इकडे तिकडे पडले. पाणी वाहून गेलं. साधक मटकन बसला. पाण्याचा वाहता प्रवाह हळूहळू थांबला. जमिनीत पाणी जिरलं आणि… हो मित्र हो, “हाच तो क्षण, हीच ती मुक्ती- हेच ते निर्वाण! त्या साधकानं फुटक्‍या मडक्‍याकडे पाहिलं मात्र आणि मायेच्या जंजाळातून तो मुक्त झाला. त्याचं मन त्या प्रतिमेवर जडलं होतं. वाटेवरच्या फुलांच्या केसरावरील सूक्ष्म कणांवर माझं प्रेम होतं, त्या घरट्यातल्या पक्ष्यांची पिल्लं पंख फडफडून कधी उडून जाणार?… या सगळ्या सगळ्यातून त्याचं मन निसटलं. त्याला आपल्या गुरूचा चेहरा आठवला. त्यांच्या चेहऱ्यावरील मंद स्मिताचा अर्थ गवसला… आयुष्यातली गहन रहस्यं शिकण्यासाठी झेन गुरूंच्या अशा अत्यंत साध्या गोष्टी वाचाव्यात. वाचता वाचता आपण दचकतो, कारण पुढे काय असं वाटू लागतं तेव्हा गोष्ट संपलेली असते. “अरेच्चा!’ असं म्हणून आपण चक्रावतो. परंतु ज्या गोष्टी मनात रेंगाळतात आणि कधीतरी निळ्याभोर आकाशात वीज चमकावी तसा त्या गोष्टींचा गूढ अर्थ आकळतो. मन त्या ज्ञानरूपी लख्ख प्रकाशानं उजळतं… माझं असं अनेकदा झालंय. मडकं फुटण्याच्या या गोष्टीशी मला खूप भारतीय संदर्भ सापडला. मला कबिरांच्या दोह्याची आठवण झाली. त्यांनी साधकाच्या मनातल्या आंदोलनाला शब्दबद्ध केलंय. कबीर म्हणतात…
भला हुवा मेरी मटकी फुटी रे
मै तो पनिया भरनसे छुटी रे…
– डॉ. राजेंद्र बर्वे
मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई.
drrajendrabarve@gmail.com

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “एकदा काय झालं

 1. dr zen katha pustak aahe kay mala te vachnasathi hav aaeh pls mala mahiti dya maza mail id deepak.jadhav1979@yahoo.com

 2. खरंय. केवळ कथाच नाही, तर हायकू इ. झेन काव्य प्रकारांमध्येही असंच रहस्य दिसून येईल. जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा ते निराळ्या दिशेने उलगडते!

  उदा.

  How long the stars
  Have been fading,
  Lamplight dimming:
  There is neither coming,
  Nor going.
  (नान्सेन)

  The plants and flowers
  I raised about my hut
  I now surrender
  To the will
  Of the wind
  (रायोकान)

  धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: