यावर आपले मत नोंदवा

नवी पहाट


वेस्टा आणि सेरेसा या अशनींच्या शोधासाठी नासाने ‘डॉन मिशन’ ही मोहीम आखली आहे. ही मोहीम संपून त्या अशनींची माहिती आणि छायाचित्रं आपल्याला मिळायला आणखी बरीच वर्षं जावी लागतील. त्यानंतर मात्र आपल्या सौरमालेविषयी अनेक गुपितं उलगडलेली असतील.
………………….
आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं, की दिसतं तेवढंच जग आहे. विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असं तर केशवसुतांनी म्हणूनच ठेवलं आहे. ज्याची जितकी झेप तितकंच जग त्याला दिसतं आणि तितकंच तो खरं मानून चालतो. पण त्याच्यापलीकडेही खूप गोष्टी असतात, त्यांच्या असण्यालाही काही अर्थ असतो. तो काय असतो, हे कळणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नसतं. पण शास्त्रज्ञांना मात्र त्याचा अंदाज असतो. त्यानुसार ते आपलं काम करत राहतात, त्याच्यातून जे काही हाती लागतं, त्यामुळं सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात फारसा फरक पडत नाही. पण त्याच्या जाणिवा समृद्ध होतात. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा वाढतात. जगाकडं पाहण्याची त्याची नजर बदलतेच पण रात्रीच्या शांत वेळी आभाळाकडं पाहतानाही त्याच्या मनात विचारांची चक्रं फिरू लागतात. मी कोण आहे, मी इथं कुठून आलो, कशासाठी आला, माझ्या असण्याचा नेमका अर्थ काय असे प्रश्न तर पूवीर्पासूनच माणसाला पडत आले आहेत. पण त्याहीपलीकडं जाऊन हा सारा पसारा कोणी आणि कशासाठी मांडला आहे, असंही कोडं जाणिवा समृद्ध होताच कोणालाही पडू लागतं.
म्हणजे बघा की ज्या सूर्यमालेमध्ये आपली पृथ्वी आहे, त्या सूर्यमालेचा जन्म ४६० कोटी वर्षांपूवीर् झाला. त्यावेळीच बुध, मंगळ, शुक्र, शनी, पृथ्वी, गुरू अशी ग्रहमाला तयार झाली. त्याचवेळी काही अशनींचीही निमिर्ती झाली. मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या दरम्यान अशनींचा एक मोठा थोरला पट्टाच आहे. काळाच्या ओघामध्ये त्यातील काहींमध्ये थोडेफार बदल झाले आहेत. पण काहींमध्ये मात्र फारसे बदल झालेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल, जड वस्तूंमध्ये कसे बदल होतील, पण एक लक्षात घ्यायला हवं की आपली पृथ्वीसुद्धा कितीतरी पालटली आहे. तिच्यावर दरदिवशी बदल होत असतात. तिचा पृष्ठभाग पालटत असतो. आकाशातून अनेकविध गोष्टी तिच्यावर येऊन आदळत असतात. वाऱ्याने माती उडून जात असते. पाण्याच्या जोरदार प्रवाहानं मातीची धूप होत राहते. हवेत टाकल्या जाणाऱ्या वायूंमुळे वातावरणात बदल होत जातात. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पृथ्वीवर सूक्ष्मपणे बदल होत जातात. या बदलांमध्ये पृथ्वीचा इतिहास जसा काही हरवून जातोे. पण काही अशनींबाबत तसं नाही. याची जाणीव असल्यानंच नासानं एक मोहीम हाती घेतली आहे. सर्व गोष्ट नीटपणं पार पडल्या, तर याच आठवड्याच्या अखेरीला एक अवकाशयान या मोहिमेवर रवाना होणार आहे.
ही मोहीम आहे. वेस्टा आणि सेरेसा या नावाच्या अशनींच्या शोधाची. पैकी सेरेसा ही अशनी चांगलीच मोठी आहे. बरीचशी वर्तुळाकार असलेल्या या अशनीचा परिघ ९३० कि.मी. आहे. गेल्याचवषीर् इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेनं तिला लघुग्रहाचा दर्जा बहाल केला आहे. सन १८०१मध्ये शोध लागलेल्या या लघुग्रहाचा पृष्ठभाग धुळीनं भरलेला आणि खडकाळ आहे. मात्र या खडकाळ पृष्ठभागाखाली पाण्याचा बर्फ आहे, गोठलेल्या वायूचा नाही, अशी शास्त्रज्ञांची अटकळ आहे. याउलट स्थिती वेस्टाची आहे. या अशनीचा परिघ ५२५ कि.मी. आहे. सेरसानंतर सहा वर्षांनी म्हणजे सन १८०७मध्ये या अशनीच्या अस्त्विाचा शोध लागला. या अशनीचे काही तुकडे थेट आपल्या पृथ्वीवरही येऊन आदळले आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे तुकडे आले, ते अर्थातच उल्कांच्या रूपात. पण ते आले. अशाच अनेक गोष्ट पृथ्वीवर येऊन पडत असतात आणि तिचं रूप पालटत असतात. तर वेस्टाचे काही तुकडे इथं येऊन पडले आहेत. वेस्टाचा पृष्ठभाग गोठलेल्या लाव्हारसापासून तयार झाला आहे. म्हणजेच तो बेसॉल्ट खडकासारखा आहे. त्याच्या दक्षिण धृवावर आठ कि.मी. खोल असलेलं आणि तेरा कि.मी. पसरलेलं एक प्रचंड असं विवर आहे. हे विवर कशामुळं तयार झालं माहीत आहे, तर एका भयानक अशा टकरीमुळं. या टकरीतूनच या विवराच्या आकाराचा भाग वेस्टापासून फुटला. त्याचे अनेक तुकडे झाले. वाळूच्या कणापासून ते अगदी टेकडीपर्यंतच्या आकाराचे हे तुकडे वेस्टापासून अलग झाले आणि मग त्यांना स्वतंत्र अस्तिव मिळालं. अवकाशाच्या अथांग अशा पोकळीतून त्यांचा स्वत:चा असा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. त्यातील काही आपल्या पृथ्वीवरच आले. आपल्यावर पडणाऱ्या उल्कांपैकी पाच टक्के उल्का या वेस्टापासून फुटून निघालेल्या भागाच्या आहेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
तर या दोघांचा अधिक अभ्यास करण्याची ही मोहीम आहे. या अभ्यासाचा हेतू वेस्टा आणि सेरेसा यांच्या अंतर्भागाचा वेध घेणं हा आहेच पण त्याहीपेक्षा त्यांचा आकार, वस्तुमान निश्चित करणं हा आहेे. त्यांच्या पृष्ठभागाचा तपास करतानाच त्यांच्यावरील विवरांचाही अधिक सूक्ष्मपणे वेध घेण्यात येणार आहे. वेस्टा आणि सेरेसा यांच्यावर असलेल्या पाण्यानं त्यांच्या विकासामध्ये नेमकी काय भूमिका बजावली आहे, त्याचाही छडा लावण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या जन्माच्यावेळच्या स्थितीचा अंदाजही या अशनींच्या अभ्यासातून येऊ शकणार आहे. अर्थात ही सगळी माहिती मिळण्यासाठी आपल्याला बरंच थांबावं लागणार आहे. याचं कारण हे अवकाशयान वेस्टावर पोचेल, तेच मुळी २०११ सालामध्ये. तिथून सेरेसावर जायला २०१५ साल उजाडेल. तिथून आलेल्या छायाचित्रांचं विश्लेषण करून आणि माहितीचा अन्वयार्थ लावून आपल्या ज्ञानकक्षा वाढण्यास आणखीही काही काळ जावा लागेल. पण त्यानंतर मात्र आपल्या सौरमालेबाबतच्या आपल्या जाणिवेच्या कक्षा चांगल्याच विस्तारलेल्या असतील. सूर्यमालेच्या जन्मवेळच्या स्थितीचा अंदाज आपल्याला आलेला असेल. त्या अंदाजामुळं आपल्याला ज्ञानाच्या उजेडामुळे एक नवीनच पहाट समस्त मानवजातीच्या जीवनात उगवलेली असेल. म्हणूनच या मोहिमेला नाव दिलं आहे, डॉन मिशन. या मोहिमेला शुभेच्छा.
– श्रीराम शिधये

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: