यावर आपले मत नोंदवा

मन पाखराचे होई


[ Saturday, July 07, 2007 08:40:38 pm]
भटकंतीचं वारं तसं लहानपणापासूनच माझ्या अंगात भिनू लागलं. ही भटकंतीच आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या छंदांचे रंग भरणार आहे, हे तेव्हा काही ठाऊक नव्हतं. हे रंग भरताना प्रत्येक वेळी भटकंतीच्या जोडीला पाऊस साथ देत होता. भटकंतीच्या छंदाचा वारसा मला वडलांकडूनच आला. त्यावेळी वडील आम्हाला सुट्टीमध्ये बाहेरगावी घेऊन जात असत. मोठ्या सुट्टीत लांबवर जायचो. पण छोट्या सुट्टीतही लोहगड-विसापूर, राजमाची, माथेरान इथे मनमुराद भटकंती व्हायची. त्यावेळी पावसात माथेरानमध्ये आता असतो एवढा राबता नसायचा. जवळपास बंदच असायचं ते. आठवणीत असलेला तो पहिला पाऊस मला भेटला तो माथेरानमध्येच. आणि हा पाऊस मला एकटा भेटला नाही, तो आला संतूरच्या अलगद किणकिणीबरोबर…

खान कॉटेजमध्ये आम्ही त्यावेळी रहायला जायचो. सत्यविजय हॉटेलमध्ये जेवायचो. मी पाचवीत असतानाचा तो काळ. पहाटेच्या वेळी आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. तो Paaus1

मेअखेर किंवा च्या मध्यातला सुमार असेल. तेव्हा बहुधा पाऊस इतकी वाट पहायला लावायचा नाही. या सीझनमध्ये कधीही अवचित पाऊस आपल्याला गाठू शकतो. अशा वेळी माथेरानमध्ये डोंगराचा माथा अक्षरश: ढगात असतो. पहाटेची वेळ होती. माथेरानची धुळीची वाट. गारबेट पॉइन्टकडे आम्ही निघालो होतो. जंगलाचा तो मस्त वास. गारबेट चालताना अचानक जंगलातूनच ढग जाऊ लागले. म्हणजे येताना भिजणार हे नक्की. पहाटेच्या वेळी असं कुंद वातावरण झालं की, मातीमध्ये एक दमटसा सुवास जाणवू लागतो. चार-दोन थेंब हलकेच कधी येऊ लागतात, त्याची चाहूल आपल्याला लागते तीही या वातावरणात पसरणाऱ्या मातीच्या सुवासानेच.

त्यावेळी ट्रान्झिस्टर प्रचलित होता. वॉकमन वगैरे कुणाकडे नसायचे. पं. शिवकुमार शर्मांनी संतूरवर ‘गुजरी तोडी’ छेडला होता. संतूरची किणकिण सुरू असतानाच पावसाची बरसात सुरू झाली. ते स्वर अंगावरून ओघळत होते आणि त्याचवेळी ढगांचे लोटही अंगाखांद्यावरून जात होते. ही अत्यंत वेगळी अनुभूती होती. मला शास्त्रीय संगीताची आवड लागली, ती त्याच वेळी. एवढी वर्षं मी पाऊस बघितला असेल, पण हा असा पाऊस मला भेटला, तो मला कायमचा लक्षात राहिला. या पावसानेच मला संगीताची ओढ लावली. तेव्हापासून मग मी संगीताचा ध्यासच घेतला. ठिकठिकाणी जाऊन पं. भीमसेन जोशी, शिवकुमार शर्मा यांच्या रेकॉर्ड््स, तबकड्या धुंडाळू लागलो. पावसाने मला दजेर्दार संगीताची गोडी लावली. बहुधा पावसाचं हे आयुष्यभराचं ऋणच असावं माझ्यावर. या स्मृती माझ्या मनावर अजून घर करून आहेत.

*********

सह्यादीत फिरणं मला कायम आवडत आलंय. गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड. कॉलेजच्या दिवसांत ट्रेकिंगची आवड खूप लागली होती. त्याच दिवसात मी एकटाच राजगड चढून गेलो होतो. चोर दरवाज्याच्या वाटेने मी वर गेलो. अशीच पहाटेची वेळ होती. पद््मावतीच्या पलीकडे येऊन उभा राहिलो. पहाट होत होती. उजवीकडे पुरंदर अस्पष्ट दिसत होता. समोर तोरण्याचा बुधला तेवढा दिसत होता. मी एकटाच होतो. त्याचवेळी माझं संगीतशिक्षणही सुरू होतं. नुकताच पहाटेचा ललत राग शिकलो होतो. पण आरोह-अवरोह तेवढेच येत होते. सूर नीट लागत होते. त्यामुळेच स्वरांचा आनंदही मिळत होता. अचानक काय झालं कुणास ठाऊक; ललत गावा, असं मला मनोमन वाटलं आणि आरोह-अवरोह सुरू झाला. नी रे ग म, मम मग, रेगम रेमगरेसा…

पुरंदरच्या दिशेने उजाडू लागलं होतं. ते दृश्य अवर्णनीय होतं. त्याचवेळी क्षणार्धात ढगांनी मला वेढून टाकलं. पावसाचे ते थेंब आणि समोर आरक्त वर्णातल्या ढगांत विरणारा पुरंदर आणि तोरणा, अंगाला बिलगून जाणारे ढग, सकाळची अंग शिरशिरून टाकणारी थंड हवा आणि अगदी सहजच तोंडून बाहेर पडणारे ललतचे स्वर… केवळ ललत नव्हे, ते स्वरमय स्वगत होतं, कारण ते स्वर निव्वळ माझ्यासाठी होते. माझं गाणं ऐकायला कुणी नव्हतं. केवळ राजगडच होता आणि होते ढग आणि पावसाचे थेंब.

ही आठवण तर तशी अगदी आताआताची. दोन वर्षांपूवीर्ची. रोह्याजवळच्या सूरगडावर मी विथ फॅमिली गेलो होतो. मी, राणी आणि अभिषेक. तिघेही जण एकत्र होतो. पाऊस तर मस्तच पडत होता. आम्ही तिघेही एकत्र जाण्याचा हा योग तसा विरळाच होता. पण त्या दिवशी माझ्या हाताला लागलं होतं. त्यामुळे क्रेप बॅन्डेज लावून वाटचाल करण्याखेरीज Paaus2

माझ्याकडे पर्याय नव्हता. एक हात जायबंदी असल्याने मला आधार घेताना त्रास होत होता. सूरगडाच्या माथ्यावर गेल्यावर दिसलेलं दृश्य फारच सुंदर होतं. एका हिरव्याकंच पठारावरून खाली ताम्हिणी घाट दिसत होता. पुण्याला कोकणाशी जोडणारा हा घाट आणि तिथे कोसळणारं भिरेतलं पाणी. सगळंच अचंबित करणारं. पण हा आनंद उतरताना काही टिकला नाही. एक हात जायबंदी असल्याने दुसऱ्या हातावर सारखा भार टाकणं जमत नव्हतं आणि त्याचाच मग फटका बसला.

ओहोळातून उतरताना शेवाळ्यावरून सरकलो आणि दुसऱ्या हाताला जखमच झाली. माझा मित्र डॉ. रवी रुपवते बरोबर असल्याने त्याने दुसऱ्या हाताचं क्रेप बँडेज काढून या हाताला लावलं. ट्रेकमध्ये खूप जण होते, त्यामुळे फॅमिलीची चिंता नव्हती. पण मला मात्र हा ट्रेक कायमचा लक्षात राहिला. मी आजवर सह्यादीत एवढं फिरलो, पण इतकं कधी लागलं नव्हतं. कितीही फिरलो, तरी निसर्गापुढे तुमचं काही चालू शकत नाही, हे या पावसाने यावेळी मला शिकवलं. हा ट्रेक आणखी एका गोष्टीसाठी माझ्या लक्षात राहिला. हाताला एवढं लागल्यानंतरही मी रोह्यापासून माझी गाडी चालवत मुंबईपर्यंत आलो. तेव्हाही पाऊस होताच. हा ड्राइव्हही माझ्या कायम लक्षात राहील.

*******

भटकंती मालिका तोपर्यंत पर्यटनप्रेमींमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्याचं एक पुस्तकही काढण्यात आलं. सर्व ट्रेकर्सच्या लाडक्या असलेल्या हरिश्चंदगडावर त्याचं प्रकाशन करावं, अशी एक कल्पना निघाली. हरिश्चंदगडावर गेल्यावर किशोर कदम अर्थात्् ‘सौमित्र’ त्याच्या पावसाळी कविता वाचेल आणि पुस्तक प्रकाशन होईल, असं ठरलं. या सोहळ्यात ज्यांना सहभागी व्हायचंय, त्यांनी व्हावं, असं चॅनलने घोषित केलं होतं. हरिश्चंदगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर गावापाशी एक टपरी आहे, तिथे भेटावं, असं त्यांनी सांगितलं होतं. १६ ऑगस्टचा दिवस होता तो. त्या दिवशी मला चांगलं आठवतं, धो धो पाऊस सुरू झाला. मी जुन्नरहून थेट खिरेश्वरला येणार होतो. एवढ्या धो धो पावसात कितीसे लोक येणार, असं मला वाटू लागलं होतं. याच विचारात मी खिरेश्वरपाशी आलो, तेव्हा धुक्यात बुडालेला हरिश्चंदगड पाहून मन भरून आलं. पण तिथे ढगांनी जेवढी दाटी केली असेल, तितकीच दाटी खिरेश्वरपाशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांनी केली होती.

हे पाहूनही माझं मन तितकंच भरून आलं. तीन-चारशे लोक तिथेच जमले होते. राज्याच्या विविध भागांतून हे लोक जमले होते. ट्रेकला सुरुवात केली, तोपर्यंत ही संख्या सातशेवर गेली. अनेकांना तर परत पाठवावं लागलंं. हरिश्चंदगडावर नेहमीप्रमाणे तुफान हवा होती. गडावर जाताना टोलारखिंड पार केल्यावर सात टेपाडांची चढउतार करावी लागते. या डोंगरांवर हिरवीगार दुलई अंथरली गेली होती. वारा आला की, तिथे हिरव्या रंगाची लहर उमटायची. केदारेश्वराच्या गुहेमध्ये शे-दीडशे लोकांचा त्यावेळी मुक्काम झाला. हा संपूर्ण एपिसोडच मी माझ्या आयुष्यात जतन करून ठेवलाय. मुळात आपल्यासाठी, केवळ आपल्यासाठी एवढे शेकडोंनी लोक येतात, ही कल्पनाच खूप सुखद होती. त्यात सोबतीला पाऊस होता, मस्त धुंद वातावरण होतं. ‘सौमित्र’च्या कविता होत्या. हा सुंदर योग जुळून आला. तो त्या वाऱ्यावर डोलणाऱ्या हिरव्यागार गवतासारखाच मनात राहील.

माझं आणि कवितेचं लहानपणापासून काही फार सख्य कधीच नव्हतं. या कवितेचं नातंही माझ्याशी जोडलं, ते पावसानेच. खंडाळ्याला आम्ही घर बांधायला घेतलं, तेव्हाची गोष्ट. कॉन्ट्रॅक्टरने ऐनवेळी लाथ दिली आणि थोडं विषण्ण होऊनच पहात राहिलो होतो. त्याचवेळी पावसाचे ढग आले. घराचे दरवाजे उघडल्यावर तिथे ढग आत येतात, असं तिथलं वातावरण आहे. हे ढग जसे आत येतात, तसेच कवितेचे शब्द माझ्या मनात आले आणि ते बाहेर पडले. ‘मन पाखराचे होई’ या माझ्या काव्यसंग्रहातली पहिली कविता ‘ओल’ ही मला तिथेच झाली.

नभ दाटून बरसे

ओली झुळूक सुकवी

ओली पाती गवताची

माळ मोत्याची बनवी

ओला सुवास मातीचा

अंग शहारून जाई

फुलं पाहून ओलेती

ओला भिजलेला शब्द

ओली आठवण येई

येई कढ अनावर

ओले मन ऊतू जाई

ओल्या लाकडाचा धूर

मन धुमसत राही

आग आग पावसात

साथ भिंत ओली देई

ही कविता घर बांधत असताना झाली होती. घराचा पाया भरला होता. बाजूला हिरवा माळ दिसत होता. पावसाची थेंबथेंब रिपरिप सुरू झाली आणि मला कविता झाली. पण घर पूर्ण व्हायचं होतं. थोडी धाकधूक होती. त्यामुळेच या कवितेत शेवटी थोडं औदासिन्य जाणवतं. घराच्या भिंती झाल्या, खिडक्या झाल्या, तेव्हा मात्र मनानेही उभारी घेतली. लाकडी चौकटीच्या काचांमधून बाहेर बरसणारा पाऊस दिसू लागला. हा पाऊस मनाला उभारी देणारा होता. धुकट काचांवर आठवणींचे ओघळ उमटू लागले आणि पाऊस नावाची दुसरी कविता झाली.

पाऊस

शब्द आले ओघळुनी

धुकट खिडकीच्या तळाशी

उभट रेषा आठवांच्या

रेंगाळती काचेवरी

दिसले पुराणे गाव मज

हळुवार रेषांपलिकडे

साचलेले शब्द हळवे

नाव त्याचे शोधिती

गाव, रस्ते, वळण, चेहरे

फेर धरिती भोवती

धूसर स्मृतींना ये उजाळा

स्वप्न होई रात ती

शब्द गेले ओघळूनि

फिकट रेषा लोपल्या

बाहेर रिपरिप थांबली

अन्् रिमझिम वाढली

पाऊस मी जितका या उघड्या डोळ्यांनी मुक्तपणे पाहिला, तितकाच तो कॅमेऱ्याच्या व्ह््यूफाइन्डरमधूनही पाहात आलो. कॅमेऱ्याच्या चौकटीत बंदिस्त करताना सूर्यास्त, माणसांचे चेहरे आणि पाऊस या तीन गोष्टी मला सर्वात भिडतात. पावसामध्येही ग्रे आणि हिरव्या रंगांच्या विविध छटा माझ्या पटकन नजरेत भरतात. मी पावसाचे हजारो फोटो काढले. हजारो फोटो वायाही घालवले. एकूणच फोटोग्राफी हे जितकं कलेतलं काम तितकंच कष्टाचंही काम. फिरायला बाहेर पडायचं आणि तेही पावसात, तर फोटोग्राफीची आयुधं खूप काळजी घेऊन जपावी लागतात. एक तर कॅमेरा महाग असतो आणि त्याच्या लेन्सेस जपाव्या लागतात. त्यामुळे रात्री मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर लेन्सेस पुसत बसणं हाच माझा उद्योग असतो. हे काम कष्टाचं असतं, पण आनंददायी असतं.

पूवीर् फोटोचं फ्रेमिंग खूपच महत्त्वाचं असायचं. एखादा फोटो फुकट जाण्याची भीती असे. आता डिजिटलच्या जमान्यात ते काही राहिलेलं नाही. सह्यादीत तर मी भरपूर फोटोग्राफी केली. आता माथेरानचाच हा फोटो बघा. Paaus3

कलर आणि डिजिटल फोटोग्राफीच्या दिवसातही मला हा ब्लॅक अॅन्ड व्हाइटमध्ये शूट करावासा वाटला. अर्थात तसं तांत्रिक स्वातंत्र्यही होतं. काही जणांना हा फोटो जुन्या माथेरानचा वाटतो. झालं असं. पावसात भिजत उभ्या असलेल्या रिक्षाची ही फ्रेम मला खूप आवडली, पण रिक्षाच्या छपराचा निळ्या कापडाचा रंग या फ्रेममध्ये मला विजोड वाटत होता. तो डोळ्यात खुपत होता. रंगीत फोटोला ती मजा येणार नाही, असं वाटलं. त्यामुळेच ही फ्रेम ब्लॅक अॅन्ड व्हाइटमध्ये घेण्याचा विचार मनात आला.

मलेशिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड… सगळ्या ठिकाणचा पाऊस मी पाहिलाय. हिमालयातही गेलो. पण मला मात्र सह्यादीतला पाऊसच तुफान आवडतो. काळ्या खडकावर शेवाळं जमल्यावर त्याचा बदलणारा रंग पाहण्यात मजा असते. २ ते ४ हजार फुटांवर सह्यादीमध्ये सदाहरित जंगलं आहेत. तिथली जंगलं अजिबात प्लॅन्ड वाटत नाहीत. त्यातून ढग जाताना हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसू लागतात. हिमालयात हे सगळं काहीसं प्लॅन्ड वाटू लागतं. तिथले देवदार वृक्ष, लडाख, काश्मीर, मनालीमध्ये ठराविक उंचीच्या वर बर्फच असतो.

तिथे काही आपलं जाणं होत नाही. स्वित्झर्लंडलाही बर्फवृष्टीच जास्त. लंडनमध्येही पावसात अतिथंडीच जास्त असते. मलेशियातलं पावसाचं वातावरण काहीसं कोकणासारखंच वाटतं. पण या सगळ्या ठिकाणच्या पावसापेक्षा सह्यादीतल्या पावसाचं वातावरणच मला आवडतं. त्यातही पावसाच्या आधीचं वातावरण मला भारून टाकतं. मेघमल्हाराचे सूर मला त्यामुळेच भावतात. आकाशात ढग दाटून येतात, आकाश अक्षरश: पॅक होऊन जातं. मग थोडावेळ पावसाची रिपरिप सुरू होते. हा पाऊस मला आवडतो. धुँवाधार पाऊस मात्र घरी बसून बघायलाच मला आवडतो. त्यात फिरायला आवडत नाही. श्रावणापेक्षाही नुसतं मळभ अधिक पसंत असतं. पावसाची रिपरिप सुरू झाली की, त्यात फिरणं अक्षरश: मन धुंद करून टाकतं. असा हा पाऊस आला की, माझं मन लगेचच शहराबाहेर धाव घेत

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: