27 प्रतिक्रिया

ऐश्वर्याची मंगळागौर


[ Monday, August 20, 2007 09:12:01 pm]

नवीन लग्न झालेल्या ललनांची पहिली मंगळागौर चांगलीच रंगात आलीये. ऐश्वर्याच्या आईच्या आग्रहाखातर तिची मंगळागौर बच्चन मंडळींनी धुमधडाक्यात साजरी केली. या ‘ स्टार मंगळागौरी ‘ ला बॉलीवुडचं अवघं तारांगण अवतरलं , सोबत अमरचाचा होतेच. मग खेळ , फुगड्या , उखाणे यांनी जी धमाल आली , ती काय वर्णावी… ?

महाराष्ट्राच्या मातीत आपण वाढलो असल्याने आपल्या ऐश्वर्याची या श्रावणात मंगळागौर मोठी धुमधडाक्यात करायची इच्छा तिची आई वृंदा राय यांनी बच्चन कुटुंबियांजवळ व्यक्त केली. त्यांच्यात आपापसात यावर साधक बाधक चर्चा झाली आणि मा. अमरसिंहानी निर्णय जाहीर केला , ” मंगळागौर होईल पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ती बच्चन साहेबांच्या बंगल्यातच होईल. ” त्यावर राय पटकन बोलून गेल्या.

अग बाई , हे पण असणार ? मग येणाऱ्या नट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसाच राहणार. वेळ कमी असल्याने सर्वांना मोबाइल , एस.एम.एस. करूनच मंगळा गौरीची आमंत्रण गेली. बायकांची ‘ फुलनाईट ‘ पाटीर् असणार असे समजून अनेक जणी तयारीने आल्या होत्या. पाटीर्चा ड्रेसकोड होता हिरवी साडी. ब्लाऊजचे रंग कुठलेही असले तरी चालतील पण घाला असा आदेश जया बच्चन बाईंनी काढला नाहीतर उगीच माझ्याकडे किनई त्या रंगाचा ब्लाऊजच नाहीये हे निमित्त नको.
जसजशा हिरॉईन्स जमू लागल्या , राय व बच्चन यांनी ऐश्वर्या अभिषेक बच्चन यांना पुढे घेऊन मंगळागौर पूजन उरकले म्हणजे सगळ्या नाचायला मोकळ्या. अभिषेक नवाकोरा कुर्ता पायजमा घालून कौतुकाने मिरवत होता. अमिताभजी प्रत्येकीं जातीने स्वागत करत होते व अमरसिंहजी प्रत्येकीला हात धरून आतपर्यंत आणून सोडत होते.

सोनाली बेन्दे-बहलला लवकर जायचं असल्याने फुगड्या , झिम्मा , पिंगा उखाणे वगैरे खेळांना सुरुवात झाली. ‘ मद्य ‘ भागी अर्थातच अमरसिंह. सोनाली निघाली तशी सर्वांनी उखाणा घेण्यासाठी आग्रह धरला.

सोनाली :
पडद्यावर दिसत नसले तरी ,
बसले नाही स्वयंपाक करत.
सांभाळून रहा सगळ्या जणी ,
लवकरच येतेय मी परत.

कैतरीनाला त्यातलं निटसं काही कळलं नाही , तशी ती म्हणाली , ” परत येतेय तर ही जातेयच कशाला ?” मग सर्वांनी कैतरीनाला आग्रह केला.

कैतरीना :
मंगळाची कृपा म्हणून ,
तुला अभिषेक मिळाला.
तू झालीस बाजूला तेव्हाच ,
सलमान लागला गळाला.

सर्व धामधुमीत अमितजी आपली लेटेस्ट हिरॉइन तब्बू बरोबर फुगडी घालत होते. त्यांना थांबवून सर्वांनी तब्बूला उखाण्याचा आग्रह केला.

तब्बू :
सासऱ्यांबरोबर तुझ्या ,
पिक्चर केलाय मी ‘ चिनीकम ‘.
कसले हॅण्डसम आहेत सांगू ,
आत्तापर्यंतचे सगळे ‘ पानीकम ‘.

हे ऐकून ऐश्वर्या एक दीर्घ उसासा सोडत मनात म्हणाली त्यांच्याकडे पाहूनच तर अभिषेकशी लग्न केलंय. सर्वांनी मग श्रीदेवी मोर्चा वळवला.

श्रीदेवी :
अनिलची मी हिरॉइन ,
पण बोनीचे पटकावली
पहिल्या बायकोला त्याच्या
मी कमरेला लटकावली.

श्रीदेवी व शाहरूखची पत्नी गौरी खान गप्पा मारत होत्या. श्रीदेवी म्हणाली , किती योगायोगाची गोष्ट आहे , माझी मंगळागौर सुद्धा ट्यूसडे लाच झाली होती. ‘ यावर गौरी खान ‘ ने आमच्यात हे असले सगळे प्रकार शक्यतो शुक्रवारीच होतात अशी माहिती पुरवली. मग गौरीला सर्वांनी गळ घातली.

गौरी :
आमच्या मंुबईत वाढलेय मी ,
मला सपोर्ट आहे माहेरचा.
क…क… किरण केल्यावर ,
त्यांना रस्ता दाखवते बाहेरचा.

करीना कपूरने कशासाठीतरी अभिषेकला हाक मारताना चुकून ‘ जीजू ‘ म्हटलं. ते ऐकून स्तंभीत झालेल्यांनी करीनाला उखाणा घ्यायला लावला.

करीना :
बहू शोधण्यासाठी अमितचाचांनी
लावला लांबचा चष्मा
म्हणूनच इतक्या जवळ असूनही
दिसली नाही ‘ करिष्मा ‘.

भाजपच्या खासदारीण बाई हेमा मालिनी यांना समाजवादी पक्षाच्या खासदारीण बाई जयाबच्चन यांनी आग्रह केला तेव्हा बच्चन साहेबांकडे एक तिरपा चोरटा कटाक्ष टाकत त्यांनी उखाणा घेतला.

हेमामालिनी :
बागबान के सेट पर की बात ,
मै किसी को नही बताऊंगी.
जब तक है जान ,
जाने जहाँ मै नाचूंगी…

असे म्हणून पुन्हा त्या जोशात नाचू लागल्या. सर्व हिरॉइन्स , अभिषेक अमरसिंह व अमितजी देखील त्यांच्या सोबत नाचत होते आणि इतक्यात गरम धरमजींचा तो कर्णकर्कश डायलॉग जोरात ऐकू आला. ” बसंती , इन कुत्तों के सामने मत नाचना! ” ते ऐकून सर्वजण एका क्षणात स्तब्ध झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर भिती मिश्रीत चिंता होती. अमरसिंह मात्र अपमानामुळे संतापून थरथरत होते. तेवढ्यात कोणाचे तरी लक्ष गेले. अमरसिंहांच्याच धाकट्या कार्ट्याने शेजारच्या खोलीत ‘ शोले ‘ ची डीव्हीडी डॉल्बीवर लावली होती. त्यात नेमका तो सिन तिथे आला त्याला तो तरी काय करणार पण अमरसिंहाची त्यालाच थोबडावून खालच्या मजल्यावर खेळायला पाठवून दिले. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला व आता अमरसिंहानाच आग्रह केला.

अमरसिंह :
बस फुगडी खेळून ,
माझे गुडघेसुद्धा लागलेत दुखू.
मैत्रीच्या ओझ्याखाली ,
बच्चनसाहेब मात्र लागलेत वाकू.

आपण वाकलो नाहीत हे दाखवण्यासाठी बच्चनसाहेब आणखी जोरात फुगड्या घालू लागले. तेव्हा न राहवून जया बच्चन म्हणाल्या ,

जया बच्चन :
थकून जाल नाचून ,
जरा आता… थोडा दम खा
स्टॅमिना ठेवा राखून
यायचीय अजून रेखा

ही मिर्ची जरा अमितजींना जास्तच लागली आणि त्यांनीही लगेच टोला हाणला.

अमिताभजी :
जयाच्या राजकीय कारकिदीर्वर ,
अमरसिंहचा पहारा.
सुटलोय सगळ्या भानगडींतून ,
आता नकोसा झालाय ‘ सहारा ‘

जया बच्चनने परिस्थिती काबूत आणण्यासाठी अभिषेकला पुढे केेले.

अभिषेक (लाजत) :
एवढ्या भरल्या संसारात ,
आता एकच राहिल्येय उणीव.
नातवंडे आल्याशिवाय यांना ,
वयाची होणार नाही जाणीव.

याला आता ऐश्वर्या काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ऐश्वर्या :

पती-पत्नीचं नातं आहे आता ,
नट-नटी नाही आहोत आपण.
आणखी थोडासा धीर धर ,
वी आर सेलिब्रेटिंग श्रावण।

अशी साजरी झाली आपल्या ऐश्वर्याची मंगळागौर!

– तुषार श्रोत्री

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

27 comments on “ऐश्वर्याची मंगळागौर

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: