7 प्रतिक्रिया

देवाचे शहर


एक मनुष्य होता. त्याचा छोटासा व्यवसाय होता. घर, संसार, व्यवसाय या सर्व आघाड्यांवर लढताना त्याची खूपच तारांबळ उडत असे. रोज रात्री झोपताना तो देवाजवळ प्रार्थना करायचा, “देवा मला अशा जागी घेऊन चल, की जेथे व्याप-ताप, काळज्या काहीही नसेल. मी जी इच्छा मनात आणेन, ती पूर्ण होईल.’
… आणि खरोखरच एक दिवस देव त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, “तुझ्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करेन. फक्त मी सांगतो तसं कर. अमुक दिशेने प्रवास करायला सुरवात कर. काही दिवस प्रवास केल्यानंतर तुला एक मोठ्ठं शहर लागेल. त्या शहराच्या पुढे एक मोठं वाळवंट आहे. ते पार केल्यानंतर तू माझ्या शहरात येऊन पोहोचशील. तुझ्या सगळ्या काळज्या मी दूर करेन. फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेव, वाळवंटाच्या अलीकडच्या शहरातील लोक तुला माझ्या शहरात यायचे अनेक जवळचे मार्ग सांगतील. तू त्या मार्गाने आलास तर जेमतेम माझ्या शहराच्या वेशीपर्यंत पोहोचू शकशील. कालांतराने तुझी तिथून हकालपट्टी होईल. मग तुझी अवस्था सध्यापेक्षाही वाईट होईल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुझं तूच काय करायचं ते ठरव.’ इतकं बोलून देव अदृश्‍य झाला.

दुसऱ्या दिवशी त्याने बायको-मुलांना स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. देवाच्या शहराचा शोध घेण्याचा मनोदयही जाहीर केला. घरच्यांनी त्याला विरोध केला. त्याने आपला सुखाचा जीव दु:खात घालावा, असं वाटत नव्हतं. उलट आहोत त्यात अजून काटकसर करण्याचं, हौस-मौज कमी करण्याचं आश्‍वासनही त्याला दिलं.

हे सगळं ऐकल्यावर देवाच्या शहरात जाण्याचा त्याचा निश्‍चय थोडासा उणावला. तरीही आतून कुठेतरी वाटत होतंच, की देव माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्याने मला मार्ग व्यवस्थित सांगितलाय. धोक्‍याच्या जागाही दाखवल्यात. मग जाऊन बघायला काय हरकत आहे?

हो-नाही करता करता त्याने देवाच्या शहरात जायचं निश्‍चित केलं. बाकी कोणालाही बरोबर न घेता तो निघाला. निघताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून वाटखर्चासाठी थोडे पैसे बरोबर घेतले.

तो वाळवंटाच्या अलीकडच्या शहरात पोचला, तेव्हा त्याच्याजवळ फारच थोडे पैसे शिल्लक होते. देवानं सांगितल्याप्रमाणे तिथे त्याला जवळचा मार्ग सांगणारे, देवाच्या शहराच्या वेशीजवळ नेऊन सोडतो म्हणणारे, अनेक जण भेटले; पण त्या कोणाचंही न ऐकता त्यानं वाळवंटातून चालत जायचं ठरवलं. वाळवंटातून चालताना त्याला अनेक वादळांचा सामना करावा लागला. कित्येकदा त्याला भुलवण्यासाठी, त्याची दिशाभूल करण्यासाठी वाटेत अनेक जण आडवे येत; पण त्याचबरोबर त्याच्यासारखे ठराविक ध्येयाने प्रेरित होऊन शहराकडे वाटचाल करणारे समविचारी लोकही त्याला भेटले.

अशाप्रकारे एकमेकांशी गप्पा मारत पुढे वाटचाल करता करता देवाच्या शहराची वेस आता दृष्टीच्या टप्प्यात आली. आता केवळ एक-दोन दिवसांचाच प्रवास उरला असेल. इतक्‍यात मोठं वादळ झालं आणि सगळ्या दिशा आंधळ्या करून या साऱ्यांना भलत्याच दिशेकडे ढकलत घेऊन जायला लागलं. मग या लोकांनी ठरवलं, की आपण एकमेकांचे हात घट्ट पकडून हे वादळ शमेपर्यंत आहे तिथेच उभं राहायचं.

कालांतराने वादळ शमलं; पण समोर पाहिलं तर वेस अदृश्‍य झाली होती. सभोवार नजर टाकली, तर कोणत्याही दिशेला देवाच्या शहराचा मागमूस नव्हता. सुदैवानं त्यांच्यातील एकाला अशा प्रकारच्या वादळांचा थोडाफार अनुभव होता. वादळानंतर योग्य वाट कशी काढायची, याचीही थोडीफार माहिती होती. त्याने रात्रीच्या अंधारात ग्रह, तारे, चंद्र, ध्रुव वगैरेवरून एक दिशा ठरवली. सूर्याच्या उगवती-मावळतीवरून ती पक्की केली आणि सर्वांनी तीच दिशा धरून चालायला सुरवात केली.

अखेर दोन-तीन दिवसांनी ते देवाच्या शहराच्या वेशीपाशी येऊन पोचले. आपण आल्याची खबर द्वारपालाला दिली. त्यांच्या अंगावरचे कपडे जरी मळके, फाटके असले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांची खबर देण्यासाठी द्वारपाल धावतच देवाकडे गेला. आत प्रवेश मिळण्यापूर्वी ही मंडळी तिथेच जराशी विसावली आणि चालत आलेल्या मार्गाकडे पाहू लागली. त्यांना जाणवलं, की त्यांची दृष्टीसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त तीक्ष्ण आणि स्पष्ट झाली आहे. ज्या मार्गाने आपण चालत आलो, त्या मार्गाने बरेच लोक चालून येताहेत. काहीजण वाटेतच खचून, नाउमेद होऊन कोसळून पडताहेत. फक्त थोडेसेच लोक या मार्गावर पुढे पुढे वाट काढत, सर्व अडथळ्यांचा सामना करत येताना दिसताहेत. जे कोणी जवळच्या मार्गाचा वापर करताहेत ते देवाच्या शहराच्या वेशीचा दरवाजा दिसेल इतक्‍या अंतरापर्यंत पोचताहेत आणि तिथे आल्यावर तयार होणाऱ्या वादळात भरकटत जाऊन भलतीकडेच फेकले जाताहेत.

इतक्‍यात द्वारपालाने स्वत: देवच त्यांच्या स्वागताला आपल्याची बातमी त्यांना दिली. सर्वजण वेशीतून आत शिरले. प्रत्यक्ष देव त्यांच्या स्वागताला उभा होता. देवाच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला, कारण प्रत्येकाला देव हुबेहूब स्वत:सारखाच दिसत होता.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

7 comments on “देवाचे शहर

  1. देव देवळात नाही भाव तेथे देव कथा छानच Very Best Story

  2. तुमची कथा छान होती,खरच माणसातच देव असतो पण तो लवकर सापडत नाही.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: