यावर आपले मत नोंदवा

‘मराठी बाण्या’च्या निमित्ताने….१


काल ‘मराठी बाणा’ पहाण्याचा योग आला. योगच म्हणायला हवा. कारण बोरिवलीत आमच्या ठाकरे नाट्यगृहात महीन्यातून ४ ते ५ वेळा हा कार्यक्रम होतो. म्हणजे साधारणत: आठवडयाला एकदा. या कार्यक्रमाच्या ऍडव्हान्स बुकिंगची सूचना २ दिवस आधीपासूनच वृत्तपत्रात झळकायला लागते. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल जात असल्याने…ऍडव्हान्स बुकिंग सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८.३० ला खिडकी उघडल्यावर पहिले आपण असू याची यापुर्वी किमान ८ ते १० वेळा काळजी घेतली तरीही खिडकीवरचा माणूस खिडकी उघडल्या उघडल्या प्रयोग हाऊसफुल्ल असल्याचे सांगतो ? मग चेहरा पाडून पहावे….तर आपल्याआधी येऊन प्रयोग हाऊसफुल्ल करणारी; प्रत्येकी १ अशी १००० किंवा चौकोनी कुंटुंबाचे तिकिट काढणारी २५० माणसे तर कुठेही दिसत नाहीत. मग तिकिटे गेली तरी कुठे ? तिकीटाची खिडकी बंद असताना बुकिंग कसे काय हाऊसफुल्ल झाले बुवा ? असले बाष्कळ प्रश्न आपल्याला पडून काही उपयोग नसतो….कारण त्यांची उत्तरे मिळत नाहीत.

हं…तर मी योग अश्याकरता म्हटलं, की शनिवारी आम्ही तिथेच खाली एक केंब्रिजचा सेल लागलेला असल्याने चक्कर मारायाला गेलो होतो. आठवडयाला एक प्रयोग लागतच असल्याने; प्रयोग कधी आहे याची माहिती नसूनही अहोंना हुक्की आली आणि त्यांनी खाजगीत तिकिटांची चौकशी केली. आम्हाला ४ तिकिटे हवी होती. ४ एकत्र तिकीटे उपलब्ध नसल्याचे कळले. एका ठिकाणची एकत्र फक्त ३ तिकिटे मिळतीलसे लक्षात आले. मग दुसरे एखादेच शिल्लक आहे का ? अशी पुन्हा विचारणा केल्यावर पुढचे जास्त किमतीचे एकच तिकिट मिळू शकेल असे सांगण्यात आले. यावेळेला निदान वेगवेगळी का होईना पण तिकिटे मिळताहेत या आनंदावर समाधान मानून आम्ही तिकिटे घेऊन घरी आलो. प्रयोग रविवारी दुपारी ४ वाजता होता.

दुस-या दिवशी वृत्तपत्रांत नेहमीप्रमाणे प्रयोग हाऊसफुल्ल असल्याचे वाचायला मिळालेच. इथपर्यंत ठिक आहे….मग डोक्यात किडा वळवळायला लागला की यावेळी प्रयोग रविवारी, दुपारी ४ चा असून सुध्दा आदल्या दिवशी पर्यंत प्रयोगाची तिकीटं उपलब्ध राहू शकतात ? राहातील ही…..पण आम्हाला जी तिकिटं दिली गेली ती आधीचं कोणीतरी काढून ठेवलेली असावी…..कारण ती घडी घालून ठेवलेली होती. शिवाय ती कपाटात सुरक्षित ठेवलेली होती. नवीन तिकीटं जेव्हा आपण काढतो तेव्हा…..देणारी व्यक्ती तक्ता पाहून …आसन क्रमांक घालून पुस्तकातून नवी कोरी  तिकीटे आपल्या हवाली करते. दुसरी शंका अशी मनात आली की कदाचित कोणीतरी तिकीटे रद्द करायला आले असतील आणि तीच तिकिटे आपल्याला उपलब्ध झाली असतील. पण लगेच लक्षात आले…की आपण घेतलेली तिकिटे रद्द करायची झाल्यास आपल्यालाच समक्ष येऊन इथे तिकिटाच्या अपेक्षेने आलेल्या लोकांना गाठावे लागते. खिडकीवर आपण अशी विनंती केली तरी ती कोणी एकून घेत नाही आणि जबाबदारी तर त्याहून घेत नाही. त्यामुळे ही शक्यता निकालात निघाली.

मग पुढे अजून डोकं चाललं आणि आठवलं की तिकिटांच्या तक्त्यावर आम्ही जी तिकिटं घेतलेली होती त्यावर आधीच फुल्या मारलेल्या होत्या. त्या बघुन मी तिकीटं घेताना त्यांना विचारलेही पण त्यांनी त्या प्रश्नाला बगल देऊन दुस-या व्यक्तिशी संभाषण सुरू केले. शिवाय त्या तक्त्यावर इतर फुल्यांवर एक निळ्या रंगाची वेगळी खूणही होती. जी आम्हाला दिलेल्या आसन क्रमांकांच्या ठिकाणी नव्हती. आम्हाला तिकिटं देताना त्या व्यक्तिची त्याच्या सहका-याशी थोडी बातचीतही झाली आणि तू तिथली दे….मी इथली देतो असे संभाषण संपले.

या सगळ्यावरून मी असा निष्कर्ष काढला की. हा प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचं सगळं श्रेय या तिकिट विक्रेत्यांना जात असावं. प्रयोग लागला की प्रत्येक रांगेतली काही तिकीटं ब्लॉक करून ठेवायची आणि मागणा-याची गरज पाहून पुडी वळायची हा ही प्रकार यात असू शकतो. या ही पुढे जाऊन  कदाचित दाखवायचा तक्ता वेगळा आणि विकायचा तक्ता वेगळा असे ही असू शकते. कदाचित यांत हस्ते परहस्ते ‘मराठी बाणा’कारांचाही हात असू शकतो. कारण शेवटी पुरवठा कमी ठेवून हाऊसफुल्ल ची हवा तयार करायची मग आपोआप मागणी वाढतेच आणि मागणी वाढली की आपोआप प्रयोग हाऊसफुल्ल होतोयचं की !

हा माझा आरोप म्हणा किंवा नुसती शंका म्हणा पण या शंकेला कारणीभूत अशी घटनाही प्रयोग सुरू व्हायच्या आधी घडली. अगदी आमच्या शेजारच्या आसन क्रमांकाच्या तिकीटांचा घोळ झाला. दोन च जागा असताना तीन दिल्या गेल्या. थोड्क्यात एकाच नंबराची जागा दोघांना मिळाली आणि तिथे त्यांची जुंपली. मग ते निस्तरलं गेलं हा भाग वेगळा.पण त्यातल्या एका कुटुंबाला आमच्याच सारखं वेगवेगळं बसून प्रयोग पाहावा लागला. आम्ही हा पर्याय स्वत:हून स्विकारला होता पण त्यांना नाईलाजाने स्विकारावा लागला. शिवाय प्रयोग सुरू झाल्यावर अजून एका ठीकाणच्या दोन स्त्रियांना उठवून त्यांना पुढे बसायला देऊन तिथे दस्तुरखुद्द द्वारपाल येऊन बसले. आता जर तिकीट विक्री झालेली होती तर तिकीट घेतलेली व्यक्ती कधीही येऊन बसू शकली असती. पण प्रयोग चालू झाल्यानंतर १० मिनिटात ज्या खात्रीने त्यांना शिफ्ट करण्यात आलं त्यावरून असं वाटतं की याला आयोजकांची संमती असावी. म्हणजे संबधितांनी तिकिटं ब्लॉक करायची, आयोजकांनी प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याचे सांगत आभार मानायचे, इतका हाऊसफुल्ल जातोय त्याअर्थी खरोखरच तेवढा चांगला प्रयोग असणार असे मानून जास्त दराची तिकिटे काढून धन्य झाल्याचे समाधान मानायचे. प्रत्यक्षात प्रयोग तेवढ्या लायकीचा आहे की नाही याची कोण खातरजमा करणार ? प्रयोगानंतर हिशोब करताना सत्य माहित असल्याने आयोजकांना फरक पडत नसेलच. म्हणून प्रश्न पडतो की प्रयोग हाऊसफुल्ल होतो की केला जातो.

इथे कुणीही मला ’मराठी माणूस पुढे गेलेला पहावत नाही’ या वृत्तीची समजू नये. मी फक्त मला आलेला अनुभव विशद केला. कोणाला आलेला आहे का असा काही अनुभव ?

प्रयोगाबद्दलही लिहीन….पुढच्या भागात.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: