3 प्रतिक्रिया

माझा आणि आशाताईंचा ट्विटरवरचा संवाद…..


आशाताई म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले जेव्हा ट्विटरवर अवतरल्या तेव्हा मला कोण आनंद झाला होता. कारणं सांगत बसणार नाही पण ह्या एका व्यक्तिमत्वाचा मी फार आदर करते. महाविद्यालयीन जीवनात तर अनेकदा मी त्यांना प्रत्यक्ष भेटल्याची स्वप्नं पाहिली आहेत, आणि त्यांना प्रत्यक्ष बघितल्यावर माझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीये हे ही स्वप्नात पाहिलंय 🙂 . पुढे युटिआयच्या सब रजिस्ट्रारपैकी एकाकडे नोकरी करत असताना, युटिआय ने एक योजना संपल्यानंतर दुसर्‍या योजनेत त्याचे परिवर्तन करताना काही अर्ज भरून पाठवायला सांगितले होते, तश्या एका अर्जाबरोबर आशाताईंचं पांढर्‍या स्वच्छ कागदावर मोठ्ठी सोनेरी अक्षरं इंग्रजीत छापलेल्या लेटरहेडवरचं पत्र; मी त्याची बरेच पैसे मोजून कलर झेरॉक्स मारून बरीच वर्ष जपून ठेवलं होत. अनेकदा पाकीटावरचा पत्ता वाचून एखादं पत्र पाठवायचा मोह व्हायचा पण धाडस कधीच झालं नाही. धाडस न होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडून उत्तर आलं नाही तर काय ? आपल्या आवडत्या व्यक्तिची आपल्या मनात असलेली प्रतिमा भंग होईलशी सारखी भिती वाटायची. बरं त्यांना लिहिणार तरी काय ? की “तुम्ही मला आवडता, एकदा प्रत्यक्ष भेटायचे आहे” ? त्यामुळे तसा कधी प्रयत्नच केला नाही. म्हणूनच म्हटले की आशाताई जेव्हा ट्विटरवर आल्या तेव्हा मला अतिशय आनंद झाला. १४० अक्षरांच्या मर्यादेत पण हवे तेव्हा हव्या त्या सेलिब्रिटीशी संपर्क साधू शकणारा हा जादूई चिराग म्हणता येईल.
आशाताई ट्विटवर आल्याचं कळल्यावर लगेचच मी त्यांचा पाठलाग (फॉलो) करायला सुरूवात केली. त्यांना “मला तुम्हाला लहानपणापासून भेटायची खूप इच्छा असल्याचा” निरोपही त्यांना पाठवला. पण त्यांचं काहीच उत्तर नाही. इतर बर्‍याच जणांना त्यांनी उत्तर पाठवलेली प्रत्यक्ष दिसत होती. मग मलाच उत्तर का नाही ? हे कोडं सुटत नव्हतं.
त्यानंतर पंचमदा ( आर.डी.बर्मन ) यांची जयंती होती त्या दिवशी आशाताईंनी “तू…तू है वही, दिलने जिसे अपना कहा…..” हे गाणं ऑडीयो ट्विट केलं होतं. त्यावर प्रतिसाद म्हणून मी त्यांना ” आशाताई तुमच्याकडून टेक्स्ट ट्विट्सपेक्शा ऑडीयो ट्विट्स मिळाली तर आम्हा सगळ्यांना जास्त आवडतील” असा निरोप पाठवला होता. त्यावर त्यांचं काहितरी उत्तर येईल अशी अपेक्षा केली पण छे ! यालाही उत्तर आलं नाही. मात्र आगामी अल्बमच्या गाण्यांची झलक ऑडीयो ट्विट्स करीन असं त्यांनी ट्विट्सवर खुलेआम सांगितलं होतं. त्यावरून प्रत्यक्ष मला उत्तर मिळालं नसलं तरी काही प्रमाणात अपेक्षापूर्ती होईल याची खात्री पटली.
इतकं झालं तरी मी आशाताईंशी संपर्क तोडायचा नाही हे ठरवलं होतंच…..शेवटी ही माणसं तरी किती लोकांना उत्तर देत राहातील असा सूज्ञ विचार केला. या सगळ्या काळात आशाताई या मुलगा-सून-नातवंड यांच्याबरोबर कॅनडात सुट्टी व्यतीत करत होत्या हे लक्षात येत होतं. त्या त्यांच्या आयफोन वरून ट्विटिंग करायच्या. या कामात त्यांच्या मुलाची किंवा सूनेची त्यांना मदत असायची असा त्या वारंवार उल्लेख करायच्या. मी यापूर्वी माझ्या मराठी बाण्याप्रमाणे ब्राऊजरमधूनच युनिकोडच्या सहाय्याने मी त्यांना ट्विट्स पाठवले होते. पण ते आयफोन वर त्यांना तसेच देवनागरीत दिसले असतील की नाही याचा विचारच केला नव्हता. कदाचित ते तसे न दिसल्यामुळे तर त्या प्रतिसाद देऊ शकल्या नसतील ना ? कळायला काही मार्ग नव्हता. पण आता हा किडा डोक्यात वळवळल्याने यापुढे माझा मराठी बाणा बाजूला ठेऊन एकतर सरळ इंग्लिश्मध्ये किंवा अगदीच नाही तर मिंग्लिश मध्ये त्यांना ट्विट्स पाठवायचा विचार केला. आणि लवकरच तशी संधी आली. माझ्या ट्विट्सची संख्या ४९९ झाली. अनुपम खेर यांचे माझ्यासारखेच अनेक चाहते त्यांचे असे विशिष्ट संख्येला पोचलेले ट्विट्स त्यांना अर्पण करत असतात हे मी रोज वाचते. तसाच प्रकार आपण आशाताईंच्या बाबतीत करून पाहू असा विचार केला आणि माझा ५०० वा ट्विट त्यांना अर्पण करत असल्याचा ट्विट इंग्रजीतून त्यांना पाठवला. आणि अहो आश्चर्यम्‌ ! तो दिवस उलटून जायच्या आत मला त्यांचा “आभारी असल्याचा” ट्विट उत्तरादाखल आला.
जे गेल्या २० वर्षात मला जमलं नव्हतं ते ट्विटर या जादुई चिरागामुळे २-३ महिन्यात शक्य झालं. आशाताईंना आता विचारायला हवं की त्यांना देवनागरीतले ट्विट्स आयफोनमध्ये वाचता येतात का ते ?

मी आशाताईंना पाठवलेला ट्विट
http://twitter.com/#!/majhiduniya/status/18187297727

आशाताईंच त्या ट्विट्ला आलेलं उत्तर

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “माझा आणि आशाताईंचा ट्विटरवरचा संवाद…..

  1. अभिनंदन!…. आपल्या आवडत्या कलाकारांनी आपल्या अस्तित्वाची दखल घेणे हा एक सुखद आणि रोमांचकारी अनुभव असतो….

  2. अभिनंदन.. या वयात पण इतकं नेट सॅव्ही आहेत आशा ताई हे बघुन आश्चर्य वाटतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: