32 प्रतिक्रिया

मराठी ब्लॉगर्स मेळावा २०११


काल ५ जून रोजी हा मेळावा मागच्या वर्षीसारखाच दादर येथील दादर सार्वजनिक वाचनालय इथे संपन्न झाला. यावेळचे आयोजक होते विशाल रणदिवे, सुहास झेले, महेंद्र कुलकर्णी आणि संयोजक होती कांचन कराई. काही कारणाने कांचन उपस्थित नाही राहू शकली परंतु मागच्या वर्षीच्या मिळालेल्या संयोजनाच्या अनुभवाने यावेळी तिने केलेले आयोजन चोख होते.

जमलेल्यांपैकी ८० टक्के…मागच्या मेळाव्याला हजर असलेलेले होते. मागच्या वेळी प्रायोजक, मिडियावाले, फोटोग्राफर असा जंगी कारभार होता. त्यातलं यापैकी काहीही यावेळी नव्हतं.

मुळात दरवर्षी प्रायोजकांवर ( आणि ते देखील मराठी ब्लॉगर्स करता ?) अवलंबून असणं योग्य नाही म्हणून आयोजन करताना सुरूवातीलाच वर्गणीची अट ठेवली होती. त्याकरता तीनेक महिने अगोदरच ब्लॉगर्सच्या सुचना मागवलेल्या होत्या. त्यात मेळाव्याचे ठिकाण,वेळ,दिवस,तारीख, वर्गणी द्यायची तयारी, प्रायोजक शोधण्याची तयारी, आयोजन करण्याची तयारी, मेळाव्याकडून असलेल्या अपेक्षा अश्या महत्वाच्या मुद्द्यांवर ब्लॉगर्सकडून मतं मागविण्यात आली होती. एकूण सगळ्या मतांची गोळाबेरीज करून; यावर्षीचा मेळावा मुंबईत…दादरला…रविवारी ५ जून,२०११ रोजी..संध्याकाळी ५.३० ते ८.३०…माणशी रू.१००/- या वर्गणीवर जमवायचा हे ठरले.

मिडीयावाल्यांची गरज नव्हती. कारण वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ब्लॉगर्सच्या लिखाणाची दखल मिडीया घेत असतंच.

व्यावसायिक फोटोग्राफर्स नसले तरीदेखील अनेकांनी आपापले कॅमेरे आणल्याने…हा अहवाल लिहून व्हायच्या आधीच…ते सगळे फोटो प्रकाशित देखील झालेले आहेत. शिवाय महेंद्र कुलकर्णी यांचं real time photo blogging चालू होतंच.

बहुतेकांचे ब्लॉग आधीच माहीत असल्याने प्रत्येकाने आपल्या ब्लॉगची ओळख थोडक्यात करून दिली. लीना मेहेंदळे यांनी एक महत्वाचा मुद्दा असा मांडला की, प्रत्येक ब्लॉगरने आपला एक फोटो आणि ईमेल आयडी आपल्या ब्लॉगवर अवश्य लावावा ज्यामुळे आपण कोणाचा ब्लॉग वाचतो आहोत हे कळेल आणि त्या व्यक्तिशी खाजगी संपर्क करायचा झाल्यास ईमेल द्वारे करता येईल. २०१० च्या ’स्टार माझ्या’ च्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या त्या एक परीक्षक असल्याने त्यांची ही सूचना निश्चितच उपयुक्त आहे असे मला वाटते. आलेली सगळीच मंडळी काही ब्लॉगर्स नव्हती. खास गोव्याहून हेमंत दाभोळकर म्हणून एक वाचक आले होते. त्यांनी त्यांच्या अपघाताच्या काळात बरेचसे मराठी ब्लॉग्स वाचले आणि तो एक मोठा विरंगुळा त्यांना त्या काळात होता असे नमूद केले. सुनील सामंत, सुभाष इनामदार यांच्यासारखे प्रकाशन माध्यमाशी निगडीत असणारे ब्लॉगर्स देखील इथे उपस्थित होते. नेटभेटच्या सलील चौधरींनी;ब्लॉगर्सच्या मदतीकरता नेटभेट नावाने सुरू केलेल्या ब्लॉगला आता वेब डिझानिंग,ई कॉमर्ससारखी फळे लागल्याचे सांगितल्यावर एका मराठी माणसाचा या क्षेत्रात बसलेला जम पाहून अभिमान वाटला.

कायदेतज्ञ राजीवकाका फलटणकरांशी मग ब्लॉगर्सचा संवाद सुरू झाला. कॉपीराईट आणि नुकताच निघाले्ला अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरचा कायदा याविषयी काही चर्चा झाली. खर तर हा ब्लॉगर्स मेळाव्याचा एक महत्वाचा हेतू होता. बर्‍याचदा आपण ब्लॉगर्स जे काही लिहितो, इकडून तिकडे ढकलतो ते कॉपीराईट कायद्याखाली येऊ शकते हेच आपल्याला माहीती नसते. काही वेळा आपलं काही साहित्य परस्पर आपल्या संमतीशिवाय छापलं / प्रकाशित केलं जाऊ शकतं. त्याकरता काय उपाययोजना करता येईल, सर्वात प्रथम त्या दोषी व्यक्तिला याची जाणीव करून देऊन…त्याने न ऐकल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा कसा दाखविता येईल यावर बराच उहापोह झाला. राजीवकाकांनी सगळ्या ब्लॉगर्सना वेळोवेळी यात आवश्यक ती मदत विनामूल्य करण्याचे मान्य केले आहे. मेळा्वा संपताना आलेल्या ऍडव्होकेट बीना तेंडुलकर यांनी देखील सायबर लॉ आणि सायबर क्राईम बद्दल ब्लॉगर्स मध्ये विशेषत: मराठी माणसांमध्ये जागरूकता नसल्याची खंत व्यक्त केली आणि ती वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु त्या फारच उशीरा आल्याने याबबत त्यांचे काही मार्गदर्शन मिळू शकले नाही.

मेळाव्याच्या खाद्य मध्यंतरात पुण्याहून आलेल्या सुभाष इनामदारांनी दरवर्षी हा मेळावा म्हणजे नुसती ब्लॉगर्सची ओळख, गप्पा टप्पा, भेटी गाठी, आणि वडे खाऊन घरी जाणं असा असेल तर पुढच्या वर्षीपासून मला या मेळाव्यात सहभागी व्हायला रस नाही असे एक स्फोटक विधान केले.  ह्या मेळाव्यातून काहीतरी विधायक कार्य़ पुढे घडावं अशी इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितल्यावर….

राजीवकाकांनी…”विधायक म्हणजे नेमकं काय घडावं असं तुम्हाला अपेक्षित आहे” ? असा प्रतिप्रश्न केला.

आयोजक विशाल रणदिवे यांनी…”या मेळाव्यापूर्वी मागवण्यात आलेल्या सुचनांमध्ये तुम्ही असा काही उल्लेख का केला नव्हतात” ? अशी विचारणा केली.

त्यावरती सुभाष इनामदारांनी…. “आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील ब्लॉगिंग करायला उद्युक्त करायचा विचार मांडला. त्यांनी अश्या प्रकारे विनामूल्य मदत करून सुरू केलेल्या काही ब्लॉग्जचा दाखला दिला. त्याचबरोबर मराठी ब्लॉगर्सचा एखादा संघ स्थापून…..सध्या अस्तित्वात असलेल्या ब्लॉग्जना क्रमवारी देण्याचा मानस व्यक्त केला”.

मात्र मराठी ब्लॉग्जमध्ये एकाच ठराविक विषयावरचे ब्लॉग्ज फारच कमी असतात. अश्या वेळी त्यांना कोणत्या क्रमवारीत स्थान द्यायचे ? ते योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार ? असे काही मुद्दे विशाल रणदिवे यांनी उपस्थित केले आणि ही गोष्ट अशक्य असल्याचे म्हटले. नुसती ब्लॉग्जची यादीच करायची असेल तर मराठी ब्लॉग्ज.नेट, मराठी ब्लॉग जगत सारखी संकेतस्थळे आहेत हे ही निदर्शनास आणून दिले.

इतर काही ब्लॉगर्सनी देखील यावर हिरीरीने आपली मत मांडली.

लीना मेहेंदळे यांनी याचसंदर्भात…. “अजूनही बहुतेक ब्लॉ्ग्जवर प्रेमकविता,प्रेमकथा यांनाच स्थान दिलं जातं. वेगळ्या विषयावरचं काही लिहिलं जात नाही”, अशी खंत व्यक्त केली.

सौरभ वैशंपायन यांनी….”प्रत्यक्ष मोठे लेखक किंवा प्रकाशक यांनी हे माध्यम हाताळल्याशिवाय याला प्रसिद्धी किंवा पत मिळणार नाही असे मत मांडले”

रामदास यांनी मात्र…..”या मेळाव्याला चळवळ असे म्हणू नये. काळाच्या ओघात जे काही टिकून रहायचे ते राहिलंच असे सांगून; गेल्या तीन वर्षातल्या काही दिवाळी अंकानी त्यांच्या अंकाकरता घेतलेले साहित्य हे ब्लॉ्गर्सचे होते हे निदर्शनास आणून दिले”.

देवकाकांनी….”बझ ग्रुपच्या मदतीने निर्मिलेल्या जालरंग प्रकाशनाचा आणि त्यायोगे प्रकाशित केलेल्या ई अंकांचा उल्लेख करून…केवळ लिखित साहित्य हेच साहित्य न धरता…..लिहिता न येणार्‍यांनी….आपले अनुभव ध्वनीमुद्रित/ध्वनीचित्रमुद्रित करून मांडले तरी देखील ती साहित्य सेवाच होईल” असा दिलासा दिला.

सरतेशेवटी मराठ ब्लॉगर्स आयोजकांतर्फे उपस्थितांपैकी दोन जणांना लॉटरी काढून डॉटकॉम डोमेन बक्षीस म्हणून देण्यात आले. ते सुभाष इनामदार आणि प्रियांका जोशी अश्या दोघांना मिळाले. त्यानंतर सगळ्यांचे एकत्रित फोटो काढून घेऊन ब्लॉगर्स मार्गस्थ झाले.

This slideshow requires JavaScript.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

32 comments on “मराठी ब्लॉगर्स मेळावा २०११

 1. स्तुत्य उपक्रम आहे , माझा ब्लॉग अजून बाल्यावस्थेत आहे.
  पण महेंद्र काकांचे मार्गदर्शन , व सलील चे तांत्रिक सहाय्य ह्यामुळे बरे चालले आहे.
  मेळाव्याला यायला नक्की आवडेल
  अगदी वरती उल्लेख आला तसा नुसते भेटून वडे खाण्यासाठी सुद्धा
  काय वाईट आहे.
  आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगी आपण आपली निरर्थक उपस्थिती अनेक कारणास्तव लागतो.
  पण ब्लॉग धारकांचा मेळावा ही वेगळी गोष्ट आहे.
  प्रत्येक जण पोटच्या मुलासारखे ब्लॉग ला वाढवतो आपले विचार ,आचारांनी खाऊ पियू घालतो. त्याला गेजेट ने सजवतो.
  थोडक्यात आपल्यासाठी ब्लॉग ही मर्म बंधातील ठेव असते.
  तेव्हा अश्याच ध्यासाने प्रवृत्त झालेल्या सहकार्याची एक दिवस मुक्त संवाद आपण नक्कीच साधू शकतो.
  माझ्यामते
  जेष्ठ नागरिकांना संगणक साक्षर केले तर ते ब्लॉगिंग मधील मराठी साहित्य नक्की वाचतील आणि त्यांची फुटकळ मराठी डेली सोप पासून सुटका होईल.
  त्यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

  • धन्यवाद निनाद, प्रत्येक वाचकाची भली बुरी प्रतिक्रिया देखील त्या ब्लॉगच्या यशात महत्वाचा वाटा बजावते. आपल्या ब्लॉगर्समध्ये देखील अनेक ज्येष्ठ नागरिक उत्साहाने ब्लॉगिंग करत असतात. आपल्याला हवे ते खुलेआमपणे आणि फुकट मांडता येणे ही ब्लॉग माध्यमाची जमेची बाजू आहे. त्याखेरीज वाचकांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया मिळणं हा उमेद वाढण्याचा भाग झाला.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: