4 प्रतिक्रिया

जुनं ते सोनं ????


वय वाढलं की नाविन्याबद्दलची ओढ कमी होते का हो ? किंवा आपल्या आधीची पिढी जे सांगत होती ते खरं असून त्यांना धुडकाऊन आपण जे वागलो ते सब झूट असही होत असावं का ? विज्ञाननिष्ठ अशी जी बिरूदावली मानाने मिरवत… आपण समोर येणार्‍या तंत्रज्ञानाचा फडशा पाडत सुटतो. आणि मग एके दिवशी ते सगळं आपल्याच मुळावर उठतं. पण तोपर्यंत आपण त्याच्या इतकं आहारी गेलेलो असतो की परतीचे दोर आपणच आपल्या हाताने कापलेले असतात. झालं काय की, गेल्या एका वर्षात मला जुनं ते सोनं असल्याचा अनुभव एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल चार वेळा आला.

केबल चालकाच्या मुजोरीला कंटाळून डिश टि.व्हि. ची सोय करून घेतली. पण पाच वर्ष त्या डिश ने इतकं हैराण केलं की सोय नको पण निदान प्रक्षेपण दिसू दे असं म्हणायची पाळी आली. शेवटी पदरमोड करून “पहिल्या वरा.. तूच बरा” असं म्हणत पुन्हा केबलवाल्याचे पाय धरले. अधूनमधून जेव्हा डिश च्या एच डी टी.व्ही., रेकॉर्डींग करता येणारे सेट टॉप बॉक्स, लाईफ झिंगालाला करणारे सेट टॉप बॉक्स अश्या जाहिराती मी बघते तेव्हा या दुष्टचक्रातून बाहेर पडल्याबद्दल सुटकेचा हर्षवायू मला होतो.

इंडीयावाल्यांना कनेक्टींग करणारा भ्रमणध्वनी चालू असतानाच मला इतर सोई(?) देणार्‍या भ्रमणध्वनींबद्दल प्रेमाचं भरतं येतं. बरेच दिवस जालावर शोधून त्यातल्या त्यात आखूडशिंगी बहुदुधी भ्रमणध्वनी आणून वापरायला सुरूवात केल्यावर मग लक्षात येतं की “ह्यात” अमूक सुविधा नवीन असली तरी “त्यात”ली  ढमूक सुविधा इथे नाहीये. काही हजारांचा चुराडा झालेलाच असतो पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. नवीन नाकाने दिवाळी साजरी करून दाखवायचीच अशी भीष्मप्रतिज्ञा करून नवा भ्रमणध्वनी दावणीला बांधला जातो. अश्याच माझ्या एका भ्रमणध्वनीने मला दीड वर्षानी पुन्हा मूळ इंडीया कनेक्टींगवाल्या भ्रमणध्वनीचे पाय धरायला लावले. नशीब मी तो विकून न टाकता ठेऊन घेतला होता म्हणून…….

थोडक्यात काय आपण आपलं नवं तंत्रज्ञान , नवं तंत्रज्ञान करत मागे मागे जातो….पण ते नवं तंत्रज्ञान देखील कधी जुन्यात मोडतं ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही. असा अजून एक किस्सा घडला आमच्या बाबतीत.

कुरीयरने एक पत्र घरी आलं. एका प्रतिष्ठीत परकीय वित्तसंस्थेचे….तिथे अर्थातच गेली १४ वर्ष आमचे खाते आहे. १४ वर्षापूर्वी या वित्तसंस्थेचे खातेदार असंणं म्हणजे पदरी पुण्य असल्याशिवाय शक्य नव्हतं. त्यावेळी फोन बॅंकिंग, इंटरनेट बॅंकिंग हे शब्द भारतीय वित्तसंस्थांना नवीनच होते. पण ह्या वित्तसंस्थेत हे सगळे प्रकार सुरूवातीपासून होतेच शिवाय कोणत्याही ठिकाणाहून पैसे काढण्याकरता एटीएम कार्डची सोय होती. माझे सासर्‍यांना दोन वेळा अपरात्री इस्पितळात हलवावे लागल्याने पैशाची सोय करताना अनंत अडचणी आल्या, त्यावर उपाय म्हणून आम्ही ह्या वित्तसंस्थेत खाते उघडले. आणि अडीअडचणीला पैशाची गरज पडल्यास ती भागवण्याकरता म्हणून नित्यनेमाने यात पैसे शिलकीत टाकत राहीलो. पुढच्याच वर्षी सासरे गेले… पण तरीही खाते चालूच ठेवले कारण…… वेळ सांगून येत नसते. ह्या वित्तसंस्थेत जे खाते उघडले होते….ते त्यावेळच्या इतर कोणत्याही वित्तसंस्थेच्या नियमापेक्षा जास्त पैसे अडकवून उघडावे लागले होते. खात्यात कमीत कमी २५०००/- शिल्लक असायलाच हवी अशी ती अट होती. त्यातली ९०% रक्कम काढून वापरायची मुभा होती…..पण त्यावर ११% व्याज भरावे लागत असे. जर हे पैसे वापरले नाहीत तरी त्यावर आपल्यालाव्याज मिळताना मात्र ३.५% च्या दराने मिळत असे. दुसरा काहीच पर्याय त्यावेळी उपलब्ध नसल्याने हे खाते तसेच चालूच ठेवले. गेल्या दशकात अनेक सुधारणा झाल्या. या वित्तसंस्थेसारख्याच अनेक खाजगी वित्तसंस्था कुत्र्याच्या छत्र्या्प्रमाणे उगवल्या. सुरूवातीला खातेदार खाते उघडण्याकरता त्यांच्या मागे पळत….कालांतराने आपल्याकडे खाते उघडावे म्हणून वित्तसंस्था खातेदारांच्या मागे पळू लागल्या. फोन बॅंकिंग, नेट बॅंकिंग, एटीम कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, शून्य शिलकी खाते (झीरो बॅलन्स) अशी नवीन नवीन प्रलोभने या वित्तसंस्था दाखवू लागल्या. आपल्या राष्ट्रीयकृत वित्तसंस्था मात्र अजूनही झोपलेल्या होत्या. त्यांच्याकडे रटाळ सेवेशिवाय द्यायला काहीही नव्हते आणि त्याचे त्यांना सोयरसुतकदेखील नव्हते. अश्या सेवेला कंटाळलेला तरूण ग्राहक सहाजिकच खाजगी वित्तसंस्थांकडे आकृष्ट न झाला तर नवलच. राष्ट्रीयकृत वित्तसंस्थांमध्ये अजूनही रांगेत उभे राहून आपल्या खात्याच्या नोंदी पासबुकावर भरून घ्याव्या लागतात. पण खाजगी वित्तसंस्थांनी मात्र पोस्टाने घरपोच नोंदी पाठवायची सोय करून टाकली. वर्ष-दोन वर्ष बरं चाललं पण त्यानंतर मात्र या खाजगी वित्तसंस्थांनी आपले रंग दाखवायला सुरूवात केली. राष्ट्रीयकृत वित्तसंस्थांमध्ये अजूनही खात्यात अगदी जास्तीत जास्त १०००/- ची शिल्लक असली तरी ते खातं चालू राहू शकतं. पण खाजगी संस्थांनी मात्र खातेदारांना लुबाडायला एक एक नवे नियम काढायला सुरूवात केली. उदा. सुरूवातीला कमीत कमी ५ हजाराची शिल्लक हवी, मग ती १० हजारावर गेली, शिवाय ती दर तिमाही असायला हवी वरून दर महिना कमीत कमी १० हजार तुमच्या खात्यात असायलाच हवे, महिन्यातून अमूक इतक्यावेळाच एटीएम मधून पैसे काढता येतील, दुसर्‍याच्या खात्यात रोख रक्कम भरता येणार नाही एक ना दोन. इतके नियम आहेत की आपले्च पैसे आपल्याला वापरायची चोरी.

असो, तर काय सांगत होते, की….ह्या वित्तसंस्थेचे पत्र मिळाले. त्यांची २५००००/- शिलकीची अट अजूनही कायम होतीच. पण आता बदलत्या काळानुसार त्यांनी स्वत:हूनच आमच्या खात्याचे दुसर्‍या एका जास्त प्रतिष्ठा असणार्‍या खात्यात रूपांतरण केलं होतं म्हणे. बरं केलं तर केलं, पण आता शिलकीच्या अटीही बदलल्या. त्या अश्या होत्या कि, १) ३ ताखाचे एक गहाणखत असणे आवश्यक आहे. २) महिन्याला कमीतकमी ५००००/- शिल्लक तिथे असायला हवी आणि ३) दर महिना कमीत कमी ५००००/- ची गुंतवणूक आम्ही तिथे करायला हवी…..बॉ..बॉ..बॉ… या महागाईत विष खायला पैसा न्हाई आणि ही इतकी गुंतवणूक आम्ही कशी करायची बॉ ? बरं इतका पैसा आमच्याकडे असता तर स्विस बॅंकेत नसतं का खातं उघडलं 😉  !!!!

विरोपाने त्यांच्या ग्राहक प्रतिनिधीशी गुजगोष्टी झाल्या. त्यांना आमचं खातं पुन्हा पहिल्यासारखं बदलून द्यायला सांगितलं कारण झालेला बदल हा आम्ही करायला सांगितलेला नव्हता. त्याप्रमाणे खातं पूर्वपदावर आलं पण आता एक नसतंच त्रांगंडं उभं राहिलं. जुलै २०११ पासून सगळ्याच खात्याच्या शिल्लक रकमेत व्य्वस्थापनाने बदल केलेला आहे, तद्वत नव्या नियमानुसार ठरलेली रक्कमच शिल्लक म्हणून ठेवावी लागणार असे कळले. ती रक्कम होती रू.७५,०००/-. वर उपकारकर्त्याच्या थाटात त्यातली ९०% रक्क्म आम्हाला वापरू द्यायला वित्तसंस्था तयार होती. पण अर्थातच महिन्याच्या आत ती पुन्हा भरली नाही तर त्यावर व्याज द्यावे लागणार शिवाय ७५,०००/- शिलकीचा नियम मोडल्याबद्दल प्रत्येक तिमाहीला त्यावर दंड भरावा लागणार तो वेगळाच. काय शिंची कटकट आहे 😦 . गंमत तरी पहा, एक तर रु.७५,०००/- अडकवून ठेवायचे. बरं, कधी गरज पडलीच तर त्यातले ९०% वापरायचे. ते वापरल्याबद्दल बॅंकेला आपण व्याज द्यायचे. ते जर पुन्हा ७५,०००/- नाही करता आले तर दर तिमाही दंडही भरायचा. वा रे उस्ताद ! वा !……आमचेच पैसे आम्हीच अडकवून ते वापरल्याबद्दल व्याज आणि पुन्हा न भरल्याबद्दल दंड भरायचा ?

पुन्हा एकदा विरोपाने यावर मत व्यक्त केलं आणि हे जाचक नियम अमान्य असल्याचं कळवलं. त्यात हे ही लिहिलं की, आम्ही गेले १४ वर्ष आपले खातेदार आहोत…तेव्हा त्याचा विचार करून यावर योग्य तो निर्णय व्हावा. पण उलट टपाली त्यांचं उत्तर आलं की, हे नियम सगळ्यांना सारखे असल्याने, यात कोणा एकाकरता कसलाही बदल नाही. तुम्हाला ही रक्कम ठेवता येणे शक्य नसल्यास तुम्ही खाते बंद करू शकता. इतका अपमान ? एक तर साले परकीय..आमच्या भारतात येतात,बस्तान बसवतात आणि ते बसलं की इथल्याच नागरिकांना खडयासारखं वगळतात ? गेले खड्ड्यात. आम्हाला पण तुमची गरज नाही असं म्हटलं, त्यांनीच दिलेल्या दुव्यावरून खाते बंद करायचा अर्ज उतरवून घेतला, लगोलग भरला आणि त्यांच्या थोबाडावर फेकून आले. माझ्यासमोरच आणखी ४ जण येऊन याच कारणाकरता खातं बंद करून गेले. त्यांना हे अपेक्षित असावं किंवा ग्राहक आपणहून खातं बंद करतील अशी काही क्लृप्ती त्यांना लढवायची असावी, त्यात ते यशस्वी झाले खरे..पण आम्हा ग्राहकांना मात्र पुन्हा एकदा अश्या वित्तसंस्थेच्या शोधात फिरावे लागणार. म्हणून म्हटलं जुनं ते सोनं असं कुणीसं म्हटलंय ते काही खोटं नाही. कालाय तस्मै नम :

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “जुनं ते सोनं ????

  1. mala pan aavadla he sarva satya aahe nice

  2. खरं आहे आपलं म्हणनं…
    तंत्रज्ञान झपाट्याने बदलत व सुधारत आहे.पण ते तंत्रज्ञान वापरणारे सुधारायला पाहिजेत हि काळाची गरज आहे.

  3. नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना आपल्या गरजा काय आहेत हे ठरविता न आल्याने हे प्रकार घडतात.

  4. श्रेया, अतिशय समर्पक शब्दात मांडले आहेस विचार!
    मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे.
    दुर्दैवाने आता काही राष्टीयीकृत बॅंकाही त्याच वाटेवरून वाटचाल करायला लागल्या आहेत. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: