5 प्रतिक्रिया

सत्यमेव जयते???????


काल आमीर खान कृत बहुचर्चित ’सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध स्वरूपात सादर झाला, विषय खूपच गंभीर असला तरी सामाजिक भान येणं गरजेचे होते. जे जे या पापात हस्ते परहस्ते सामील असतील त्यांच्या थोबाडीत बसली असेल पण तरीही त्या व्यक्ति अजूनही खुलेआम फिरत आहेत हे पाहून केवळ चीडच आली. घटना ज्यांच्या बाबतीत घडल्या त्या तीन महिला, एक वकिल, एक डॉक्टर, काही पत्रकार, काही समाज सेवक आणि जनतेचे काही प्रतिनिधी अश्यांशी प्रत्यक्ष बोलून बरीच नसलेली माहिती या कार्यक्रमामुळे मिळाली. काही खेदजनक गोष्टी कळल्या. काही धक्कादायक सत्य उघडकीस आली. उदा. एक हरयाणाच्या सरकारी नोकरीत असलेल्या बाईने जे सांगितले ते ऐकून फारच क्लेष झाले. तिच्या म्हणण्याप्रमाणे मुलींच्या घटत्या प्रमाणामुळे घरात अविवाहीत पुरूष वाढत आहेत, जवळच्या वस्तीत सुयोग्य वधू मिळत नसल्याने इतर प्रांतांतून त्यांना विकत आणले जाते, त्या विकत आणलेल्या स्त्रीचे जीवन तर अतिशय नरकमय असते कारण पैसे देऊन आणल्याने तिला स्वत:ला कसलाही अधिकार नसतो, एका घरातल्या अनेक विवाहीत/अविवाहीत पुरूष तिच्यावर अधिकार गाजवू शकतात, कमी पैशात अश्या स्त्रिया विकत मिळत असल्याने त्या त्या प्रांतांतल्या स्थानिक स्त्रियांना देखील आता काही महत्व राहीलेले नाही, त्यांचेही हर प्रकारे शोषण चालूच आहे. त्यांच्याही अस्तिवावर एकप्रकारे घाला घातला जातो आहे, त्याचबरोबर विवाहयोग्य वधू उपलब्ध नसल्याने  आणि अविवाहित पुरूषांची संख्या वाढत असल्याने सामूहिक बलात्कार वाढत आहेत, इतकेच नव्हे तर वस्तीतल्या मुलींना देखील सुरक्षितपणे खुले आम फिरणे मुश्किल झाले आहे, थोडक्यात ज्यांनी या गोष्टीला विरोध करून मुलींना जन्म दिला ते देखील यात  भरडून निघत आहेत. माझ्याकरता ही माहिती धक्कादायकच होती. कारण मुलांचे प्रमाण वाढते आहे आणि मुलींचे घटते आहे ही बाब आधीच माहिती होती त्यामुळे मला असे वाटायचे की आता तरी मुलींकडच्यांना वधूपक्ष म्हणून काहीतरी मान मिळेल, वरपक्षाकडून होणारे शोषण थांबेल. मुख्य म्हणजे आतापर्यंत मान खाली घालून फक्त नकार पचवत रहाणार्‍या मुलींनादेखील आता काहीतरी निवडायचा वाव मिळेल. पण जे ऐकले ते सगळे भयानक नग्न सत्य होते.

एक खेदजनक बाब या कार्यक्रमात कळली ती अशी की, ज्या डॉक्टरांशी आमीर खान ने संवाद साधला; त्यांनी सांगितले की सत्तर च्या दशकात लोकसंख्या नियंत्रणाकरता सरकारनेच ही अल्ट्रा साउंड ह्या टेस्टची जाहिरात बाजी करून ती लागू केली. वास्तविक सरकारने लोकसंख्या नियंत्रणाकरता ’एक या दो ही बच्चे’ ची जाहिरात केल्याचे स्मरत होते पण अल्ट्रासाउंडचा उपयोग जर लिंगनिदान करून स्त्री भ्रूण हत्येकरता केला गेला असेल तर सरकारनेच जनतेला चुकीचा संदेश दिला हे निश्चित. पण म्हणून अल्ट्रा साउंड परीक्षा बिन महत्वाची ठरत नाही. माझ्या माहितीप्रमाणे अल्ट्रा साउंड हे सोनोग्राफीचेच दुसरे नाव आहे. सोनोग्राफी प्रत्येक गरोदर महिलेला तिसर्‍या आणि सातव्या महिन्यात करावी लागते. ती करण्याचे कारण म्हनजे जर गर्भात काही दोष / व्यंग असेल तर सोनोग्राफीत तो कळून येतो. साधारण १२ आठवड्यांनी सोनोग्राफी केली की त्यावेळी गर्भाचे लिंग निश्चित झालेले असते, त्यामुळे लिंग निदान होऊ शकते. पण म्हणजे अल्ट्रा साऊंड चा उपयोग लिंगनिदान इतक्याच कामाकरता नाहिये. तर गर्भात काही दोष / व्यंग नाही ना हे कळण्याकरता अल्ट्रा साउंड चा खरा उपयोग आहे. वास्तविक काल दोन डॉक्टर तिथे उपस्थित असून देखील एकाने देखील अल्ट्रासाऊंड म्हणजे काय? किंवा त्याचा खरा उपयोग काय आहे याचा उल्लेख केला नाही. अजूनही भारतात अनेक सुशिक्षित लोकांना देखील अल्ट्रा साउम्ड म्हणजे काय हे माहित असतेच असे नाही, त्यामुळे आमीर खानच्या फिल्मी व्यक्तिमत्वाचा प्रभाव असणार्‍या ज्या लाखो-करोडो लोकांनी कालचा कार्यक्रम पाहिला असेल त्यांतील अनभिज्ञ महिलांनी नक्कीच अल्ट्रा साउंड या शब्दाचा धसका घेतला असेल. ही चूक सुधारली जावी अशी इच्छा मी सत्यमेव जयते च्या फेसबुक पेजवर व्यक्त केली आहे, पाहूया  काही उपयोग होतो का ते ! कारण यामुळे नवरा – बायको यांच्यात हकनाक वितुष्ट येण्याचा देखील संभव आहे, उद्या डॉक्टरांनी अल्ट्रा साउंड करायला हवी असे सांगितले तर बायकोला वाटायचे की नवर्‍याचेच अथवा सासरच्या माणसांचे काही कारस्थान असेल. चांगल्या डॉक्टरवर देखील निष्कारण ठपका येऊ शकतो.

खरं तर अश्याच स्वरूपाचा कार्यक्रम झी मराठी ने ’याला जीवन ऐसे नाव’ या नावाने रेणूका शहाणे यांच्या सूत्रसंचालनाखाली सुरू केला होता. अर्थात तो प्रातिनिधीक स्वरूपाचा नसून थोडा व्यक्तिगत समस्यांवर होता म्हणून असेल पण १२-१३ भाग होऊन तो कार्यक्रम बंद पडला. कदाचित एकाच दिवशी , एकाच वेळी एकापेक्षा जास्त निवडक वाहिन्यांवर हा कार्यक्रम दाखवण्याचा आणि त्याकरता स्टार समूहाच्या वाहिन्या निवडल्या गेल्याने त्या त्या वाहिन्यांचा प्रेक्षक आपोआप या कार्यक्रमाला मिळाला. त्याचाच परिणाम म्हणून आज एकाच भागानंतर या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद जनमानसातून मिळतो आहे. प्रश्न उरतो आहे की, जनता फक्त एक कार्यक्रम म्हणून याकडे बघणार की आत्मपरिक्षण देखील करणार?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “सत्यमेव जयते???????

 1. सत्यमेव जयते ! हा आमिरचा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे . खरोखर तो सामाजिक भान असणारा चांगला माणूस आहे . ज्याला खरेच आपल्या देशाविषयी आदर आहे आणि तो येथील वाईट चाली -गोष्टी सती जन मत तयार करतोय . gr8 वोर्क ! मुकुंद धोक्रात. Mukund dhokrat

 2. या सार्या कार्यक्रमामधून एक गोष्ट ठळक पाने जाणवली ती अशी कि स्त्री भरून हत्या हि एक डॉक्टरच्या मदतीशिवाय होवू शकत नाही आज पर्यंत लाखो मुली गर्भात मारल्या गेल्या अनेक डॉक्टरांची सोनोग्राफी सिन्त्रेस बंद पाडण्यात आली परंतु एकही डॉक्टरला या बद्दल कसलीही शिक्षा करण्यात आली नाही न कुणाची degree रद्द झाली न कुणाला तुरुंग वास झाला हे कसे काय ? जर दोन चार डॉक्टर्स न जे यात सामील आहेत गजा आड टाकले किवा त्यांची liscences रद्द केली तर इष्ट परिणाम लवकरच होईल

  • नक्कीच सुनिला, नुसतीच अटक नाही तर लायसन्स रद्द करणे हाच यावरचा अक्सिर इलाज आहे. माझ्या ब्लॉगवर आल्याबद्दल धन्यवाद.

 3. मी पूर्ण दिड तासाचा कार्यक्रम बघीतला- कुठेच अल्ट्रासोनोग्राफी मशीनच्या विरुद्ध आमिरने कुठलेही वक्तव्य केल्याचे आठवत नाही…..
  पूर्ण कार्यक्रमाचा आशय नीट पडताळून बघीतल्यास त्यात स्त्री भृणहत्येच्या विरोधात जनमत तयार करण्याचा व त्याचा सामाजिक शिक्षण व्यापक करण्याचा उद्देश्य जाणवला !
  स्त्रीभृणहत्या हा एकच विषय सत्यमेव जयतेचा नसावा (ते पुढे कळेलच!) हुंडाबळी, बेकारी, बालकांचे कुपोषण, प्रदुषण वगैरे सामाजिक विषयांना आमिर हात घालेल असे वाटतेय.
  माझ्या सारखे बुद्धीजीवी फक्त एक कळफलक समोर आहे म्हणून बडवत बसतात, कुणीतरी ह्या विषयांवर सामाजिक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय ते कौतुकास्पद आहे. खेकड्यासारखे त्याचे पाय न खेचता त्याला जमली तर मदत नाही तर कमीत कमी समर्थन तरी मला नक्कीच देता येईल.

  • आमीर ने कुठेच अल्ट्रा साउंड विरोधी भूमिका घेतली नाही हे मान्य पण सग्ळा उल्लेख “अल्ट्रा साऊंड आणि नंतर गर्भपात अश्या पॅकेज मध्ये होतो” अश्या आशयाने चालू होते.

   माधव, तुमचे म्हणणे खरेच आहे…आपल्यासारखे बुद्धीजीवी समोरचा कळफलक बडवत “हे सांगायला हवे होते, हे सांगायला नको होते” असे बडबडत रहातो पण प्रत्यक्ष कृती काहीच करत नाही. पण इथे लोकांना चुकीची माहिती मिळून त्यांचा समज गैरसमजात रुपांतरीत व्हायला नको म्हणून मी हे सगळे लिहिले, ते देखील अर्थात मला थोडी माहिती होती म्हणून. उद्या एखादा विषय ज्याबद्दल मला काहिही माहिती नाही असा चर्चिला गेला तर त्यातले चूक काय आणि बरोबर काय मला कळणारच नाही म्हणा, त्यामुळे त्यावर मी लिहिणारही नाही. पण त्यामुळेच कदाचित त्या कार्यक्रमात जे काही सांगितले जाईल तेच प्रमाण मानण्याची चूक देखील मी करेन.

   मुख्य म्हणजे मी या कार्यक्रमाच्या अजिबात विरोधात नाही. उलटपक्षी कोणीतरी या विषयाला हात घालून समाजाला खडबडून जागे केले णि उदासीन सरकारला चपराक दिली त्याबद्दल सत्यमेव जयते च्या चमूचे अभिनंदनच करीन.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: